Manoj Jarange Patil | जालन्यात वाळू माफियांविरोधात प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील नऊ आरोपींना जालनासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर याचाही समावेश आहे.
मनोज जरांगे यांच्या मेहुण्यासह 9 वाळू माफिया आणि अटल गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. या आरोपींविरोधात जालन्यातील अंबड, घनसावंगी आणि गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
या आरोपींवर वाळू चोरी, जीवे मारण्याचा प्रयत्न, अंतरवली सराटीच्या आंदोलनात केलेली जाळपोळ यासह सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी जालना गुन्हे दाखल आहेत. गोदी पोखरणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. काही आरोपींविरोधात 2019 पासून वेगवेगळ्या प्रकरणात हे गुन्हे दाखल आहेत. आणखी काही प्रस्ताव प्रशासनाने तयार केले आहे.
सहा आरोपी जरांगे यांच्या आंदोलनातील आंदोलक
नऊ जणांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. या नऊ जणांपैकी सहा आरोपी हे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील आंदोलक असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे त्यांचा मेहुणा विलास खेडकर याचाही यामध्ये समावेश आहे. जालना, बीड, परभणी या जिल्ह्यातून त्याला सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. Manoj Jarange |
विलास खेडकर याच्याविरोधात कोणते गुन्हा दाखल?
विलास खेडकर याच्याविरोधात २०२१ मध्ये ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. २०२३ मध्ये जालन्यातील शहागड येथे बस जाळल्याप्रकरणी ३०७, ३५३ आणि ४३५ या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०२३ मध्ये गोदावरी नदीतून ४ लाख ८१ हजार रुपयांची १०० ब्रास वाळू चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर २०२३ मध्येच पाथरवाला बुद्रुक येथे गोदावरी मधून ५०० ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी विलास खेडकरला जालना, छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या तीन जिल्ह्यातून उपविभागीय न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशाने तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
मनोज जरांगेचा फडणवीसांवर निशाणा
मेहुण्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आल्यानंतर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने माझं तोंड बंद करण्यासाठी मुद्दाम माझ्या पाहुण्याचं नाव तडीपारीच्या यादीत घुसवले. हे 100 टक्के देवेंद्र फडणवीसांचं षडयंत्र आहे. आम्ही देवेंद्र फडणवीसला सन्मानाची वागणूक द्यायला तयार आहोत. नाहीतर पुढच्या काळात सन्मान हा शब्द डोक्यातून काढून टाकायचा, असंही जरांगे म्हणाले.
पुढे जरांगे म्हणाले, “तुमचं बाकीचं काय माहिती नाही, आपण त्यात पडतही नाही. पण मराठा आंदोलक म्हणून जर तुम्ही त्यांना नोटीसा देणार असला, हे तुमच्यासाठी घातक आहे,” असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
यांच्यावर झाली तडीपारीची कारवाई
1) विलास हरिभाऊ खेडकर 2) अमोल केशव पंडित 3) केशव माधव वायभट 4) गजानन गणपत सोळुंके 5) संयोग मधुकर सोळुंके 6) वामन मसुरराव तौर 7) संदीप सुखदेव लोहकरे 8) रामदास मसूरराव तौर 9) गोरख बबनराव कुरणकर.
हेही वाचा:
“पराभूत झालो असलो तरी खचलो नाही”; अजित पवारांना अमित ठाकरेंचे प्रत्युत्तर