मनोज जरांगे आज मोठा निर्णय घेणार; मतदारसंघ आणि उमेदवार ठरवणार

Manoj Jarange Patil | विधानसभा निवडणुकीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील आपले उमेदवार रिंगणात उतरवणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज जालन्यातील अंतरवली सराटीत महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली असून ते महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
ज्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यांना मनोज जरांगेंनी अंतरवलीत बोलावलं आहे. या उमेदवारांशी ते संवाद साधणार आहेत. त्यानंतर आज संध्याकाळी पाच वाजता उमेदवार आणि मतदारसंघ याची घोषणा मनोज जरांगे पाटील करणार आहेत.
ज्या मतदारसंघात निवडणूक लढवली पाहिजे असे वाटते, अशा लोकांनी अर्ज भरण्यास जरांगे यांनी सांगितले होते. त्यानुसार आता कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार असणार याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. आज संध्याकाळी पाच वाजता उमेदवार आणि मतदारसंघ याबाबत ते घोषणा करणार आहेत. या बैठकीत सर्वांच्या मते मतदारसंघात एक उमेदवार ठरवले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी मराठा, मुस्लिम ,दलित असे एकत्रित समीकरण जुळवत उमेदवार उभे करणार आहे. याबाबत त्यांनी यापूर्वीच माहिती दिली होती. त्यानुसार आता मनोज जरांगे कोणत्या मतदारसंघात कोणाला संधी देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




