मनोज जरांगे मुंबईकडे तर एकनाथ शिंदे गावाकडे….अनेकांच्या उंचावल्या भुवया

मुंबई : एकीकडे मराठा आंदोलकांचे नेते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज मुंबईच्या दिशेने कूच करण्याच्या तयारीत आहे, तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मूळगावी साताऱ्यातील दरे येथे गणपती प्रतिष्ठापनेसाठी जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या मौनावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
जरांगे 29 ऑगस्टला मुंबईत, शिंदे गावाकडे –
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन करण्याचा निर्धार जाहीर केला आहे. यासाठी ते बुधवारी, 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी दरे येथे जाणार असून, तिथे पारंपरिक पद्धतीने गणपतीची प्रतिष्ठापना करणार आहेत.
शिंदेंच्या मौनावर प्रश्नचिन्ह
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट टार्गेट केले असताना, शिंदे यांनी याबाबत पूर्णपणे मौन बाळगले आहे. मुख्यमंत्री असताना आंदोलने हाताळण्याचा अनुभव असलेले शिंदे आता का गप्प आहेत, असा सवाल राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. जरांगे यांचे ‘भगवे वादळ’ मुंबईत धडकण्याच्या तयारीत असताना शिंदे गावी जाण्याच्या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
फडणवीसांचे दूत अंतरवालीत, पण जरांगे ठाम –
मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळे यांनी अंतरवाली सराटीत जाऊन जरांगे यांची भेट घेतली. गणेशोत्सवाच्या काळात आंदोलन पुढे ढकलावे, अशी विनंती साबळे यांनी केली. मात्र, जरांगे यांनी ही मागणी फेटाळून लावली. “आम्ही मोर्चाची घोषणा आधीच केली होती, तेव्हा सरकारने का दखल घेतली नाही?” असा थेट सवाल जरांगे यांनी उपस्थित केला.
मुंबईत आंदोलनाला उच्च न्यायालयाचा ब्रेक –
मुंबईत गणपतीच्या काळात आंदोलनाला परवानगी नाकारण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न महत्त्वाचा असल्याने जरांगे यांना मुंबईत आंदोलन करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तथापि, नवी मुंबईत आंदोलनाला परवानगी देण्याबाबत सरकार विचार करू शकते, असे मत न्यायालयाने सुनावणी दरम्यान व्यक्त केले. याशिवाय, अनिश्चित काळासाठी सार्वजनिक जागा अडवता येणार नाही, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणीही न्यायालयाने नोंदवली.
आंदोलन आणि गणेशोत्सवाचा तिढा –
मराठा आरक्षणासाठी जरांगे यांनी पुकारलेल्या या आंदोलनामुळे गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील वातावरण तणावपूर्ण बनण्याची शक्यता आहे. सरकार आणि आंदोलक यांच्यातील वाद तसेच शिंदे यांच्या मौनामुळे हा विषय अधिकच चर्चेत आला आहे. आता जरांगे यांचे पुढील पाऊल आणि सरकारची रणनीती यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.





