Nagar | मनोज जरांगे पाटील यांची नेवाशात लवकरच बैठक!

नेवासा, (प्रतिनिधी) – मराठा आरक्षणासाठी रान पेटवून लढा देणारे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे जाऊन बुधवारी नेवासा तालुक्यातील मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. नेवासा तालुक्यात मराठा समाजाची घोंगडी बैठक घेण्याची मागणी जरांगे यांच्याकडे करण्यात आली.
शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेशराव शेटे पाटील यांच्या नेत्तृत्वाखाली शिष्टमंडळाने जरांगेची भेट घेतली. यावेळी त्यांनी नेवासा तालुक्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांना तालुक्यात घोंगडी बैठक घ्यावी, असा आग्रह शिष्टमंडळाने केला.
यावेळी त्यांनी हे निमंत्रण मान्य केल्याची माहिती दिली. तालुक्यातील प्रत्येक गावात लवकरच मराठा सेवक निर्माण करा, असेही त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगून या बैठकीच्या आयोजनाच्या तयारीला लागा, असे आवाहन शिष्टमंडळाला केले.
त्यामुळे नेवासा तालुक्यात लवकरच मनोज जरांगे यांची घोंगडी बैठक आयोजित केली जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील शेटे, संभाजी माळवदे, संतोष काळे, रावसाहेब घुमरे यांनी सांगितले.





