Manoj Jarange Patil : “…तर १ तारखेच्या सभेत हिशोब चुकता करणार”; भुजबळांना उत्तर देत मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Manoj Jarange Patil : राज्यातील आरक्षणाचा मुद्दा हा चांगलाच पेटला आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातील शाब्दिक चकमकीने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच छगन भुजबळ यांनी काल हिंगोलीत ओबीसी एल्गार मेळाव्यातून मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. याच टीकेला आता मनोज जरांगे यांनी उत्तर दिले आहे.
आज मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. यावेळी बोलताना,”छगन भुजबळांनी माझे पाय तोडण्याची भाषा केली. महाराष्ट्रातला जुनाट नेता जाती तेढ वाढवतो आहे. आमचं आंदोलन शांततेत होणार आहे हे आज मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ओबीसींच्या काही नेत्यांनी गोरगरीबांना आरक्षण मिळू नये असं वाटतं आहे. त्यामुळे ओबीसीचे जुनाट नेते तसा प्रयत्न करत आहेत, असाही आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. ओबीसींच्या जुनाट नेत्याचं स्वप्न पूर्ण आम्ही होऊ देणार नाही.’ असे म्हणत त्यांनी भुजबळांना उत्तर दिले.
पुढे बोलताना,“छगन भुजबळ यांच्यामुळेच वातावरण दूषित होतं आहे. त्यांची भाषाही फारच भयंकर आहे. त्यांनी थेट भीमा कोरेगवाचाच विषय काढला. तसंच जातीवाचक शब्दाचा उल्लेख केला. हे सगळं सरकारला मान्य आहे का? भीमा कोरेगावला काय झालं हे सांगत त्यांनी जातीवाचक शब्द केला. त्यामुळे त्यांच्याविरोधात खटला दाखल केला पाहिजे त्या बांधवांनी. छगन भुजबळ हे सगळं आत्ता सांगत आहेत. त्यांचा इतिहास पाहिला तर दलित बांधवांनी मोर्चा काढला होता तेव्हा यांनी मोर्चानंतर हुतात्मा स्मारक गोमूत्र शिंपडून धुवून काढलं होतं. ते आता या सगळ्या गोष्टी कशा काय सांगत आहेत?” असाही प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
तसेच “जुनाट नेत्याला सरकारने रोखलं पाहिजे. आम्ही शांततेचं आवाहन केलं आहे. ओबीसी बांधव आणि आम्ही एकत्र असताना तो छगन भुजबळ सांगतो याचे (मनोज जरांगे पाटील)पाय तोडा, ओबीसींच्या विरोधात बोललो तर पाय तोडू सांगतो. मी ओबीसी बांधवांच्या विरोधात बोललोच नाही. मी हे जुनाट नेत्याच्या विरोधात बोलतो आहे. यांचा विचार चांगला नाही. सरकार झोपलं आहे का? सरकारने त्यांना रोखलं नाही १ तारखेच्या सभेत हिशोब चुकता करणार” असा इशारा यावेळी जरांगे यांनी दिला.
छगन भुजबळ जुनाटच आहेत. या वयात शांततेचे शब्द त्यांच्या तोंडी हवेत मात्र ते दंगली भडकाव्यात असंच बोललं आहेत. आता सगळे महापुरुष आठवले, जातीवाचक बोलतात. तुम्ही २४ डिसेंबपर्यंत थांबा सगळं बाहेर काढणार आहे. आमच्या पोरांनी शिक्षण खूप घेतलं आहे. मात्र सुशिक्षित बेकार झाल्यावर तो कुणाचा तरी झेंडा हाती घेतो लायकी नसणाऱ्यांसह त्याला काम करावं लागतं त्यात काय चूक बोललो मी? मी जातीवाचक काही बोललो नाही. छगन भुजबळांनी तो अर्थ तसा घेतला. असेही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटले.





