Manoj Jarange : लिफ्ट अपघातातून मनोज जरांगे थोडक्यात बचावले; काय घडलं नेमकं?

बीड : मराठा आंदोलक आणि मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांच्या प्रत्येक हालचालीकडे राज्याचे लक्ष असते. त्यातच बीडमध्ये दौऱ्यावर असताना ते एका रुग्णालयात गेले असताना त्यांची लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळली. सुदैवाने यात कोणताही अनुचीत प्रकार न घडल्याने मनोज जरांगे हे थोडक्यात बचावले.
बीड शहरातील शिवाजीराव क्रिटीकल केअर हॉस्पिटलमध्ये रुग्णाला भेटण्यासाठी मनोज जरांगे हे जात होते. त्यावेळी अचानक लिफ्ट बिघडल्याने अपघाताची घटना घडली. यावेळी या लिफ्टचे दरवाजे तोडून त्यांच्यासह त्यांचे सहकारी बाहेर पडले. त्यानंतर अनेकांचा जीव भांड्यात पाडला. या घटनेमुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा त्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. पुन्हा एकदा मराठा बांधवांचा मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आहे. या आंदोलनाची तयारी सध्या सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांच्याकडून बैठकांचा धडाका सुरू आहे. मागील आंदोलनापेक्षा हे आंदोलन 5 पटीने मोठे असेल असेही त्यांनी म्हटले.





