Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या ‘त्या’ इशाऱ्यावर नारायण राणे म्हणाले, ‘याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे..’

Manoj Jarange | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषण सुरु आहे. यावेळी त्यांनी पाणीही न घेण्याचा निर्णय घेतला आहे. यादरम्यान जरांगे यांनी मंगळवारी (दि. 13) संतप्त भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्रात यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. नुसतं नाटकं सुरु आहेत. तुम्हाला मराठे सोपे वाटतात का? असा सवालही केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ यांचा घोटाळा मागे घेतला. पाच महिने झाले प्रक्रिया सुरू आहे. तुम्हाला राज्य शांत बघायचे नाही. पाच महिन्यांपासून फक्त प्रक्रिया सुरू आहे. आम्ही पण पोलीस विरोधात बीड आणि राज्यभर केस करायच्या आहेत. आमचेपण डोके फोडले आहेत. आम्हाला दोन हजार पोलिसांवर गुन्हे दाखल करायचे आहेत, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान, जरांगे पाटील यांच्या पंतप्रधानांबद्दल च्या वक्तव्यावर भाजप नेते नारायण राणे यांनी देखील तीव्र शब्दांत सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे.
नारायण राणेंची प्रतिक्रिया –
“मनोज जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्याला मी मराठयांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्याने आता मर्यादा ओलांडली आहे. माननीय पंतप्रधान जेंव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरुन हलून दाखव ! तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत !”, असे नारायण राणे यांनी म्हंटले आहे.
मनोज जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्याला मी मराठयांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्याने आता मर्यादा ओलांडली आहे. माननीय…
— Narayan Rane (@MeNarayanRane) February 14, 2024
मराठे काय आहेत ते तुम्ही 15, 16 तारखेनंतर बघा – मनोज जरांगे ( Manoj Jarange )
मराठा आरक्षणाबाबत सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. शिंदे, फडवणीस आणि पवार काय सरकार चालवत आहेत? सग्यासोयऱ्याची अंमलबजावणी, हैदराबाद गॅझेट आणि शिंदे समितीला एक वर्ष मुदत देत असाल तर इकडे यायचे. तुम्ही 15, 16 तारखेनंतर मज्या बघा. दोन दिवसांत अधिवेशन घेणार होते. घेतलं का? डबल रोल करू नका. मराठे काय आहेत ते तुम्ही 15, 16 तारखेनंतर बघा, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.
पुढे बोलताना जरांगे म्हणाले की, मिरज दंगल, अजित पवार, छगन भुजबळ यांच्यावरील गुन्हे कसे परत घेतले? पितृसत्ताक व्याख्या का घेतली? मी सांगितलेली व्याख्या घ्या. 31 तारखेपर्यंत सरकार राहणार आहे का? होत असेल तर खरी मध्यस्थी करा. सगेसोयरे कायदा अंमलबजावणी आणि हैदराबाद गॅझेट, गुन्हे परत घ्या, शिंदे समितीला एक वर्ष मुदत वाढ द्या, मी उपोषण कायमचे मागे घेतो. तुम्हाला वाटते का मराठे परत मुंबई येणार नाहीत. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करा”, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली.
शासकीय अधिकाऱ्यांची उपोषणाला भेट –
दरम्यान, मनोज जरांगे यांचं पाचव्या दिवशीसुद्धा उपोषण सुरु आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना सरकारकडून उपोषण मागे घेण्याची विनंती केली जात आहे. पण ते उपोषण मागे घेण्यास तयार नाहीत. जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी मंगळवारी विभागीय आयुक्त मधुकर राजे अरदड, जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल हे गेले. त्यांनी मनोज जरांगे यांना पाणी पिण्याचं आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली. पण ते उपोषण मागे घेण्यास तयार नाहीत. याउलट त्यांनी सरकारला पंतप्रधान मोदींच्या सभा होऊ देणार नाही, असा इशारा दिला. “काय नुसतं चाललं आहे, मजा चालली आहे. तुम्हाला मराठ्यांना खेटायचंय? बेसावध राहू नका. महाराष्ट्रात आम्ही पंतप्रधानांच्या सभा होऊ देणार नाहीत”, असं मनोज जरांगे म्हणाले. दरम्यान, आज बुधवारी (दि. 14) राज्यात विविध ठिकाणी बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी, विक्रेत्यांनी या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली होती.





