मनोज जरांगेंचं अंतरवालीतील उपोषण स्थगित; म्हणाले, – ‘आता समोरा-समोर लढाई’

जालना – मराठा आरक्षणासाठी पावने दोन वर्षे उपोषण करत लढा देण्यात येत आहे. पण आता हे उपोषण आपण स्थगित करत आहोत. यापुढे उपोषण होणार नाही. आता समोरा-समोर लढायची तयारी ठेवायची, असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे यांनी दिला. यावेळी जरांगे-पाटील यांनी आपल्या मागण्या मांडल्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ दिला आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईत जाणार, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. यावेळी भाजपचे आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) खासदार बजरंग सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रसचे ( अजित पवार ) आमदार प्रकाश सोळंके, जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ हे उपस्थित होते.
मनोज जरांगे म्हणाले, नोंदी शोधणारी शिंदे समिती लगेच सुरू करा. शिंदे समितीने काम करताना अधिकाऱ्यांनी किचकट अटी घालू नये. अशा अधिकाऱ्यांना थेट बडतर्फ करण्यात यावे. बीड आणि धाराशिवमधील असे दोन अधिकारी आहे. ही कीड नकोच आहे. वंशवाळ समिती गठीत करावी. मोडलिपी अभ्यासक नसल्याने नोंदी शोधत येत नाही. आमच्याकडे असलेल्या अभ्यासकांना नोंदी शोधण्यासाठी संधी द्या. सातारा संस्थान, हैदराबाद गॅझेट, बॉम्बे गॅझेट आणि औंध संस्थान पुरावे घेण्यात यावे. राज्यातील मुलांवर झालेल्या गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावे, अशा मागण्या त्यांनी केला.
तसेच एसईबीसी 10 टक्के आरक्षण आम्हाला नको होते. आता 10 आरक्षण दिले तरी सरकार 100 टक्के फीस घेत आहे. आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्यात यावी. ओबीसीत आरक्षण द्यायचे असेल, तर 2012 च्या कायद्यात दुरूस्ती करा, अशा मागण्या जरांगे यांनी केल्या आहेत.



