Manoj Jarange : मनोज जरांगेंनी पिले ग्लासभर पाणी; देशमुख कटुंबाच्या विनंतीला दिला मान !

Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी आपल्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी ग्लासभर पाणी पिले. बीडच्या मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या मातोश्री व मुलीच्या हातून त्यांनी पाणी पिले. सलगच्या उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती सातत्याने बिघडत चालली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावर तत्काळ तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे.
जरांगेंनी 25 जानेवारीपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटीत उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस होता. या कालावधीत त्यांनी पाण्याचा थेंबही घेतला नाही. परिणामी त्यांची प्रकृती बिघडत चालली होती. त्यानंतर मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या मातोश्री, मुलगी वैभवी देशमुख व बंधू धनंजय देशमुख यांनी त्यांची भेट घेतली.
यावेळी या सर्वांनी जरांगेंना पाणी घेण्याची विनंती केली. सुरुवातीला त्यांनी नकार दिला. पण अखेर त्यांच्या विनंतीला मान देत त्यांनी संतोष देशमुख यांच्या आई व मुलीच्या हस्ते पाणी प्राशन केले. त्यांची प्रकृती पाहून देशमुख कुटुंबीयांनाही अश्रू अनावर झाले. विशेष म्हणजे आंतरवाली सराटीत जरांगेंसोबत आंदोलन करणाऱ्या इतर काही उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडल्याचाही दावा केला जात आहे.
धाराशिवमध्ये आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयात :
धाराशिवमध्ये मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झालेत. त्यांनी धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःला कोंडून घेत आपले आंदोलन सुरू केले आहे. यामुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली. मराठा आंदोलकांनी जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयात स्वतःला कोंडून घेतले आहे. त्यांनी दार आतून बंदही केले आहे. यामु्ळे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्यावर कार्यालयाबाहेर थांबण्याची वेळ आली आहे.
कोअर टीममधील 8 जणांना पोलिसांची नोटीस :
जरांगेंच्या कोअर टीममधील 8 जणांना गोंदी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. जरांगेंसह उपोषणात बसलेल्या इतर उपोषणकर्त्यांच्या जुन्या आजारांचे वैद्यकीय रिपोर्ट उपलब्ध करून न दिल्याने ही नोटीस बजावण्यात आली आहे. उपोषणातील सर्व उपोषणकर्त्यांच्या नावाच्या सविस्तर यादीसह त्यांचे मोबाईल क्रमांक, उपोषणकर्त्यांचे पत्ते द्या, अशी मागणी पोलिसांनी या नोटीसीद्वारे केली आहे.





