Manoj Jarange : धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर जरांगेनी लगावला टोला; म्हणाले त्यांना रोजगार हमीचं काम द्या अन्…

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. या घटनेत वाल्मिक कराड यांचे नाव आल्याने, धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्यामुळे त्यांच्यावरही संशयाचे सावट कोसळले. विरोधकांकडून मुंडे यांचा राजीनामा मागितला जात होता. अखेर तब्येतीचे कारण पुढे करत धनंजय मुंडे यांनी मार्च महिन्यात मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र, आता पुन्हा त्यांना मंत्रिपदाचे वेध लागल्याचे दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या रायगडमधील सत्कार सोहळ्यात बोलताना धनंजय मुंडे यांनी थेट मागणी केली. “माझ्या हाताला आता काहीतरी काम द्या. कायम मार्गदर्शन करत राहा. आम्ही चुकलो तर कान धरा, पण आता रिकामे ठेवू नका. जबाबदारी द्या,” अशी भावनिक साद मुंडे यांनी घातली. या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
जरांगेचे खोचक प्रत्युत्तर
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्या मागणीवर तिखट प्रतिक्रिया दिली. “धनंजय मुंडे यांचे हात रिकामे आहेत, त्यांना रोजगार हमीचे काम द्या. बराशी खोदायला पाठवा,” असा टोला लगावत त्यांनी मुंडेंवर निशाणा साधला. तसेच, “मराठ्यांच्या नादी लागू नका, अन्यथा अजितदादांना सोडणार नाही. त्यांचाही कार्यक्रम लावणार,” असा इशाराही जरांगेनी दिला.
भुजबळांवर देखील टीका
दरम्यान, मुंडेंच्या वक्तव्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आंदोलनात सहभागी होण्याचा सल्ला दिला होता. यावर जरांगेनी हल्लाबोल केला. “ते सर्वांना आसेच कामाला लावतात, मग अलीबाबाला खेळायला मैदान मोकळे राहते. ते लोकांकडून फुकटात काम करून घेतात,” अशी खरपूस टीका त्यांनी केली.





