माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्याकडून सध्या बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला यांच्या वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन ते सध्या हे आंदोलन करत आहेत. काही झाले तरी मी अन्नाचा एकही कण घेणार नाही, असे बच्चू कडू यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. आता या आंदोलनाला पाठिंबा मिळताना दिसत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनीदेखील आता बच्चू कडूंच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. बच्चू कडू यांचे अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमधील तुकडोजी महाराजांच्या समाधी परिसरात हे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. त्यांनी सरकारकडे शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अशी मागणी केली आहे. त्यांच्या याच मागणीला मनोज जरांगे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. मनोज जरांगे आंदोलनस्थळी उद्या (11 जून) दुपारी 4 वाजता बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांच्या भेटीकडे सगळ्यांकडे लक्ष लागले आहे. राज्य सरकारचे टेन्शन वाढणार ? मनोज जरांगे यांनी पाठिंबा दिल्यामुळे बच्चू कडू यांच्या आंदोलनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. उद्या मनोज जरांगे आंदोलनस्थळी नेमकी काय भूमिका मांडणार? हे पाहणे महत्वाचे असणार आहे. तसेच बच्चू कडू यांची खालवत चाललेली प्रकृती लक्षात घेता राज्य सरकार त्यांच्या मागणीसंदर्भात काय निर्णय घेते? हे पाहणे देखील महत्वाचे असणार आहे.