मनोज जरांगे दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर दाखल; काय भूमिका घेणार ?

Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा पहिल्यांदाच दसरा मेळावा होत आहे. यासाठी बीडमधील नारायण गडावर मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहिले आहेत. दुसरीकडे बीडमध्ये भगवानगडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडणार आहे. त्यामुळे हे दोन्ही मेळावे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
जरांगे यांच्या दसरा मेळाव्याला पहाटेपासूनच गर्दी जमण्यास सुरुवात झाली आहे. काही जणांनी तर पहाटेपासूनच नारायण गडावर तंबू ठोकला आहे. तब्बल ९०० एकरामध्ये हा मेळावा होणार असून २०० एकरमध्ये वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. नुकतेच मनोज जरांगे नारायण गडावर दाखल झाले आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत आहे. काही वेळातच त्यांच्या भाषणाला सुरुवात होऊ शकते.
विजयादशमीच्या महाराष्ट्रातील जनतेला दिल्या शुभेच्छा
दरम्यान, दसऱ्या मेळाव्याला जाण्यापूर्वी मनोज जरांगे यांनी विजयादशमीच्या महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या. तेव्हा ते म्हणाले की, “आता जे काही बोलायचं नारायण गडावरुन बोलेन. सर्वांनी शांततेत यावं आणि जावं. कुणी काही केल्याने आपली एकजूट कमी होत नाही. राज्यातील जनता साडेबारा पर्यंत गडावर पोहोचेल. जे बोलायचं तिथून बोलेन. तिथे किती लोक येतील हे सांगता येणार नाही. मोजणारे मोजतील मेळाव्याला आम्ही काही तयारी केली नाही. आम्ही गरीब लोक आहोत, मी इथे काहीच सांगणार नाही,” असंही मनोज जरांगे यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आजच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने जरांगे कोणती मोठी घोषणा करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. सध्या नारायण गडावर लोकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
हेही वाचा:
धनंजय मुंडे तब्बल 12 वर्षांनंतर भगवान गडावर दाखल ; महंत नामदेव शास्त्री यांच्या पायावर टेकवलं डोकं




