नागठाणे, (प्रतिनिधी) – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी आता कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होईल असे चित्र आहे. ‘महायुती’ने राज्यात मतदारसंघनिहाय समन्वयकांच्या निवडी दि. ९ रोजी रात्री जाहीर केल्या. त्या पाहता कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे निवडणुक समन्वयक म्हणून भाजपचे रामकृष्ण वेताळ यांची, तर कराड दक्षिणचे समन्वयक म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांची निवड जाहीर झाली. त्यांच्यावर भाजपकडून निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. या निवडींमुळे ‘महायुतीचे’ उमेदवार म्हणून मनोज घोरपडे यांना उमेदवारी मिळण्याचा मार्ग सुकर झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मतदार कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण दिसुन येत आहे. या निवडी पाहता कराड उत्तर मध्ये गेल्या काही वर्षांमध्ये कमळ रूजवण्यात अग्रस्थानी असलेले मनोज घोरपडे, धैर्यशील कदम ,रामकृष्ण वेताळ यांची भुमिका महत्वाची आहे. गत लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला मिळालेल्या आकडेवारी वरून ते सिद्धही झाले आहे. अशातच धैर्यशील कदम यांनी मागील दोन विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या पक्षातुन लढल्या आहेत. सध्या ते भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. रामकृष्ण वेताळ यांनी यापूर्वी निवडणुक लढली नसली तरी ते संयोजकपदी होते. तर मनोज घोरपडे यांनी दोन निवडणुका लढवुन मतही चांगली मिळवली होती. सद्यस्थिती पाहता मागे वेगवेगळ्या पक्षात असणारे हे तिघेही सध्या महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या भाजपमध्ये आहेत. तिघांचेही मतदारसंघातील कार्य पाहता उमेदवारी कुणाला मिळणार? या संभ्रमात मतदार होते. पण दि. ९ रोजी झालेल्या समन्वयक निवडींमध्ये वेताळ यांना कराड उत्तरची तर कदम यांना कराड दक्षिणची जबाबदारी भाजपने दिली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीमधून कराड उत्तरचे उमेदवार मनोज घोरपडेच असणार व ते कमळ या चिन्हावरच लढतील हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कराड उत्तर मधील महायुतीच्या मतदार कार्यकर्त्यांमध्ये लगबग सुरू झाल्याचे दिसत आहे.