Manoj Ghorpade – कराड उत्तर मतदारसंघातील कोपर्डे हवेली (ता. कराड) येथील गावठाणातील मिळकतींवर असलेला जाचक ‘ब सत्ता’ प्रकार रद्द करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने माहिती मागवली आहे. आ. मनोज घोरपडे यांनी यासंदर्भात प्रत्यक्ष भेट घेऊन केलेल्या पाठपुराव्यामुळे गेल्या अनेक दशकांपासून रखडलेला हा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असून, यामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोपर्डे हवेली गावामध्ये सन १९८२ मध्ये नगर भूमापन योजना लागू करण्यात आली होती. त्यावेळी स्थानिक भूमापन चौकशी अधिकाऱ्यांनी तांत्रिक त्रुटींमुळे गावठाणातील बहुतांशी जुन्या वहिवाटीच्या मिळकतींना ‘ब सत्ता’ (नियंत्रित सत्ताप्रकार) म्हणून नोंदवले होते. वास्तव पाहता, हे रहिवासी अनेक पिढ्यांपासून तिथे वास्तव्यास आहेत. मात्र, मिळकत पत्रिकेवर ‘ब सत्ता’ अशी नोंद असल्याने ग्रामस्थांना आपल्याच जमिनींचे व्यवहार करताना किंवा बांधकाम परवाना मिळवताना मोठ्या प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत होता. हा अन्यायकारक प्रकार दूर करण्यासाठी आ. मनोज घोरपडे यांनी शासन स्तरावर विशेष लक्ष घातले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे महसूल व वन विभागाच्या १५ मार्च २०२१ च्या शासन परिपत्रकानुसार, नगर भूमापन सर्वेक्षणात सदोष रित्या दिलेल्या धारणाधिकार नोंदी बदलणे आवश्यक आहे. कोपर्डे हवेलीतील नागरिक हे मूळ रहिवासी असून त्यांच्यावर झालेला हा अन्याय दूर करणे तांत्रिकदृष्ट्या गरजेचे असल्याचे घोरपडे यांनी महसूलमंत्री बावनकुळे यांच्या निदर्शनास आणून दिले. आ. घोरपडे यांच्या मागणीची दखल घेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी सातारा यांना आपल्या स्तरावरून आवश्यक ते कायदेशीर निर्देश देण्याच्या सूचना केल्या आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे आता कोपर्डे हवेलीतील शेकडो मिळकत धारकांच्या नावासमोरील ‘ब सत्ता’ हा शब्द हटून त्यांना पूर्ण मालकी हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.