नागठाणे : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजप कोणाला उमेदवारी देणार याबाबतचा संभ्रम दूर झाल्याचे संकेत पक्षाने आज निवडणूक समन्वयकाच्या निवडी जाहीर करून दिले आहेत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे पडघम सध्या जोरात वाजू लागले आहेत. कोणत्याही क्षणी निवडणुक आचारसंहिता लागू होईल असे चित्र दिसत आहे. प्रत्येक राजकीय पक्षांतर्गत उमेदवारीच्या हालचालीही जोरदार सुरू आहेत. त्यातच ‘महायुती’ने राज्यात मतदारसंघनिहाय समन्वयकांच्या निवडी दि. ९ रोजी रात्री जाहीर केल्या. त्या पाहता कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक समन्वयक म्हणुन महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपचे रामकृष्ण वेताळ यांची, तर कराड दक्षिणचे समन्वयक म्हणुन भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांची निवड झाल्याचे जाहीर झाले.त्यांच्यावर भाजपकडून निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. या निवडींमुळे ‘महायुतीचे’ उमेदवार म्हणुन मनोजदादा घोरपडे यांना उमेदवारी मिळण्याचा मार्ग सुकर झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघातून वेताळ व कदम दोघेही लढण्यासाठी इच्छुक होते.कराड उत्तरमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये कमळ रूजवण्यात अग्रस्थानी असलेले मनोजदादा घोरपडे, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ यांची भूमिका महत्वाची आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला मिळालेल्या आकडेवारीवरून ते सिद्धही झाले आहे. अशातच धैर्यशील कदम यांनी मागील दोन विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या पक्षातुन लढल्या आहेत. सध्या ते भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. रामकृष्ण वेताळ यांनी यापूर्वी निवडणुक लढली नसली तरी ते संयोजकपदी होते. तर मनोजदादांनीही दोन निवडणुका लढवून चांगली मते मिळवली होती. हे तिघेही सध्या भाजपमध्ये आहेत. तिघांचेही मतदारसंघातील कार्य पाहता उमेदवारी कुणाला मिळणार हा संभ्रम होता. पण समन्वयक निवडींमध्ये दोघांना जबाबदारी दिल्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीमधुन कराड उत्तरचे उमेदवार मनोजदादा घोरपडेच असणार व ते कमळ या चिन्हावरच लढतील हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.