‘मन उडू उडू झालं’ फेम अभिनेत्याने पूर्ण केले स्वप्न; खरेदी केलं नवं घर

‘मन उडू उडू झालं’ या मालिकेने प्रेक्षकांचा जरी निरोप घेतला असला तरी आजही यातील कलाकरांनी चाहत्यांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील अभिनेता ऋतुराज फडके आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. ऋतुराज फडकेने तिचे एक स्वप्न पूर्ण केले आहे. त्याने अखेर स्वत:चं घर घेतलं आहे. ऋतुराजची पत्नी प्रितीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली आहे.
इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत प्रितीने लिहिले की, “स्वतःचं हक्काचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्नं असतं. ऋतुराज आणि मी बरीच स्वप्नं पाहिली, त्यातलच एक स्वप्नं म्हणजे ‘आपलं स्वतःच हक्काचं घर’. ते कसंही असो, लहान किंवा मोठं, पण ते आपलं स्वतःच असावं. जानेवारी 2023 मध्ये आमचं लग्न झालं आणि लग्नानंतर आम्ही दोघंही आमच्या कामात व्यस्त झालो त्यामुळे अंबेजोगाईला जाऊन आमची कुलदेवी योगेश्वरी आणि गुहाघरला जाऊन व्यडेश्वरच्या दर्शनाचा योग काही आला नाही. अधिक महिन्यात आम्हाला जसा वेळ मिळाला तसं आम्ही कर्जतला जाऊन व्यडेश्वर आणि योगेश्वरी देवीचे दर्शन घेतले आणि ओटी भरुन आलो. त्यांचे आभार मानले आणि बऱ्याच गोष्टींसाठी प्रार्थना केली.”
View this post on Instagram
पुढे प्रिती म्हणाली की, “काही दिवसांपूर्वी, आमचं ‘आपलं स्वतःचं घर’ हे स्वप्न पूर्ण झालं आणि आमची पहिली दिवाळी आज आम्ही आमच्या स्वतःच्या घरी साजरी करतोय. योगायोग म्हणजे त्या बिल्डिंगचं नाव ‘योगेश्वरी’. ते म्हणतात ना, ‘अगर किसी चीज़ को दिल से चाहो, तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने में लग जाती है’.. हे आम्ही अनुभवलं. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच आमच्यावर कायम असुद्या. दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.” या पोस्टमध्ये प्रिती आणि ऋषभनं त्यांच्या हातात घराची चावी पकडली असल्याचा एक फोटोही शेअर केला आहे. प्रिती आणि ऋषभच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी आणि सेलिब्रिटींनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.





