पुणे | मान…सन्मान…अन् भारावलेले वातावरण

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आदर्श सरपंच पुरस्कार्थीचे नाव जाहीर होताच टाळ्यांचा कडकडाट, मित्रमंडळींसह नातेवाईकांचा जल्लोष आणि मान्यवरांकडून पाठीवर मिळालेली कौतुकाची थाप.
सोबतच स्मृतीचिन्ह आणि मानपत्र स्वीकारताना सरपंच आणि गावकऱ्यांचा ऊर भरून आला. अशा आनंद आणि उत्साही वातावरणात दैनिक “प्रभात’तर्फे आयोजित करण्यात आलेला “आदर्श सरपंच’ सोहळा सोमवारी पार पडला.
या निमित्त पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले आदर्श सरपंच, त्यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांचे दैनिक “प्रभात’ परिवाराकडून स्वागत करण्यात आले. जरीचे फेटे बांधून सरपंचांनी प्रशस्त सभागृहात प्रवेश केला.
अवघ्या काही मिनिटांतच सभागृह गर्दीने भरले. मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ झाला आणि पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली. आदर्श सरपंचांचे नाव जाहीर करताच स्क्रीनवर सरपंचाचे नाव प्रकाशित करून त्याचे कार्यदेखील दाखवले जात होते.
त्यावेळी कार्यक्रमात उपस्थित संबंधित मान्यवरांची मित्रमंडळी आणि कुटुंबीयांकडून टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. त्यामुळे सभागृहात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.
“हा पुरस्कार आणि मान्यवरांची कौतुकांची थाप आम्हाला ऊर्जा देणारा आणि विकासकामाची पोचपावती आहे,’ अशा भावना या आदर्श सरपंचांनी या वेळी व्यक्त केल्या.
सेल्फी आणि फोटोसेशन…
जरीचे फेटे डोक्यावर चढताच कुटुंबीय आणि सोहळ्यासाठी सरपंचांसोबत आवर्जून आलेल्या मित्रमंडळीसोबत सेल्फी आणि फोटोशेसन करण्याची लगबग सुरू झाली.
एवढेच नव्हे, तर पुरस्कार सोहळ्यानंतर मान्यवर, मित्रमंडळी यासह समूह फोटो काढताना सरपंचांच्या चेहऱ्यावरील आनंद, समाधान हे उत्साही वातावरण द्विगुणित करणारे होते.
“हिंदुस्थान फीड्स’ यांच्याकडून प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या “सेल्फी पाॅइंट’वर उपस्थितांनी फोटो काढून घेत हा सोहळा संग्रहात साठवला.





