मनमोहन सिंह यांची शेवटची पत्रकार परिषद, विरोधकांच्या टीकेला उत्तर देत म्हणाले होते…

Dr. Manmohan Singh Passes Away : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना एम्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मनमोहन सिंह यांनी अर्थमंत्री व पंतप्रधान म्हणूनही अनेक महत्त्वाच्या निर्णय घेतले. त्यांच्या निर्णयाचे देशाच्या अर्थव्यवस्थेसह राजकीय स्थितीवर दूरगामी परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले.
पहिल्यांदा 2004 आणि त्यानंतर वर्ष 2009 मध्ये असे दोन वेळा त्यांनी देशाचे पंतप्रधानपद भूषवले. मात्र, पहिल्या कार्यकाळाच्या तुलनेत त्यांचा दुसरा कार्यकाळ अधिक वादळी होता. या कार्यकाळात त्यांच्या सरकारविरोधात अनेक आंदोलन झाली, भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ‘मौनमोहन’ सिंह म्हणूनही त्यांच्यावर टीका करण्यात आली. मात्र, त्यांनी आपली वक्तव्य व भाषणातून कधीही विरोधकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नाही. इतिहास माझ्या कामाचं मूल्यमापन करेल’, त्यांचे हे पंतप्रधानपदावर असताना शेवटच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्य अनेकांच्या कायमचे लक्षात राहिले.
शेवटच्या पत्रकार परिषदेत काय म्हणाले होते मनमोहन सिंह?
तुमच्याच पक्षाने तुम्हाला कमकुवत केले आहे का?, असा प्रश्न त्यांना शेवटच्या पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना ते म्हणाले होते की, मी कमकुवत होतो की नाही हे इतिहासच ठरवेल. समकालीन माध्यमे आणि संसदेतील विरोधी पक्षांपेक्षा इतिहास माझ्याबद्दल अधिक दयाळू असेल.
‘मंत्रिमंडळात चर्चेला आलेली प्रत्येक गोष्ट मी उघड करू शकत नाही. मला वाटते की, आघाडीच्या राजकारणाची परिस्थिती आणि मर्यादा लक्षात घेऊन मला त्या स्थितीमध्ये जे काही चांगले करणे शक्य होते, ते मी केले.’, असे म्हणत त्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले होते.
आरबीआयचे गव्हर्नर ते पंतप्रधान
डॉ. मनमोहन सिंह यांनी आपल्या कार्यकाळात विविध पदांवर कार्य केले. सुरुवातीला ते दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत प्राध्यापक होते. त्यानंतर 1982 ते 1985 या काळात त्यांनी आरबीआयचे गव्हर्नर म्हणून भूमिका बजावली. 1991 ला नरसिंह राव यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते. 2004 मध्ये ते पहिल्यांदा पंतप्रधान झाले. त्यांच्याच नेतृत्वाखाली 2009 ची लोकसभा निवडणूक लढवण्यात आली व त्यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.





