डाॅ. मनमोहन सिंग यांना आज देणार अखेरचा निरोप; निगमबोध घाट स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार

नवी दिल्ली – देशाचे माजी पंतप्रधान आणि अर्थविषयातील तज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी काल (दि.26) अखेरचा श्वास घेतला. दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालावली. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली असून देशामध्ये सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. देशासह जगभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात असून दिल्लीमध्ये त्यांच्या घरी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले आहे.
मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज (दि.28) अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांची मुलगी अमेरिकेमध्ये असून आज रात्रीपर्यंत त्या दिल्लीमध्ये येणार आहे. यानंतर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे. सध्या मनमोहन सिंग यांचे पार्थिव हे त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ठेवण्यात आलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आहे. यापूर्वी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी मनमोहन सिंग यांच्या पत्नी गुरशरण कौर यांच्याशी चर्चा देखील केली होती.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते व कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पूर्ण परिवारासह डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आहे. राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि सोनिया गांधी यांनी एकत्रितपणे पार्थिवाचे दर्शन घेतले. तसेच त्यांना पुष्पांजली वाहिली आहे. यावेळी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे देखील उपस्थित होते. कॉंग्रेसच्या या सर्व नेत्यांनी श्रद्धांजली वाहून त्यांच्या कार्याला सलाम केला. तसेच कुटुंबियांना देखील धीर दिला आहे. त्यांची कर्तव्याप्रती असलेली निष्ठा आणि देशाप्रती समर्पण आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील, अशा भावना देखील कॉंग्रेस नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत.
त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. याचबरोबर केंद्रीय मंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री जे पी नड्डा हे नेते देखील उपस्थित होते. त्यांनी पुष्पचक्र वाहून त्यांना आदरांजली वाहिली आहे. तसेच त्यांच्या अर्थक्षेत्रातील कार्याला सलाम केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निवसस्थानी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांनी मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
माजी पंतप्रधानांवर निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार –
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी ११.४५ वाजता निगमबोध घाट स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे. गृह मंत्रालयाने (MHA) शुक्रवारी एका संदेशात म्हटले आहे की, ‘सरकारने निर्णय घेतला आहे की डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार केले जातील. त्यात म्हटले आहे की, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंतिम संस्कारांची संपूर्ण लष्करी सन्मान आणि राज्य सन्मानाने व्यवस्था करण्याची विनंती संरक्षण मंत्रालयाला करण्यात आली आहे.





