मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच ; ६ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ

Manish Sisodia | दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) मनीष सिसोदिया यांच्या अडचणी संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. दरम्यान, दिल्लीतील एका न्यायालयाने गुरुवारी कथित दारू घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या आप नेत्याच्या न्यायालयीन कोठडीत ६ जुलैपर्यंत वाढ केलीय.
दुहेरी अटींची पूर्तता करण्यात अपयशी Manish Sisodia |
अलीकडेच दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना या प्रकरणात जामीन देण्यास नकार दिला होता. न्यायमूर्ती स्वर्णकांत शर्मा यांच्या खंडपीठाने म्हटले होते की याचिकाकर्ता भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जामिनासाठी आवश्यक असलेले तीन निकष आणि मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), 2002 अंतर्गत आवश्यक असलेल्या दुहेरी अटींची पूर्तता करण्यात अपयशी ठरला आहे.
न्यायालयाच्या अटींवर पत्नीला भेटणार Manish Sisodia |
उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते की ट्रायल कोर्टाने ठरवलेल्या अटींवर मनीष सिसोदिया आपल्या आजारी पत्नीला दर आठवड्याला भेटू शकतील. सर्वोच्च न्यायालयाने या वर्षी मार्चमध्ये ज्येष्ठ आप नेत्याची क्युरेटिव्ह याचिका देखील फेटाळली होती, ज्यामध्ये त्यांनी 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जामीनसंदर्भातील पुनर्विचार याचिका फेटाळल्याला आव्हान दिले होते.
सर्वोच्च न्यायालयाने 30 ऑक्टोबर 2023 रोजीच्या आपल्या आदेशात सिसोदिया यांना जामीन देण्यास नकार दिला होता, परंतु पुढील तीन महिन्यांत या प्रकरणाची सुनावणी संथ राहिल्यास ते पुन्हा जामिनासाठी अर्ज करू शकतात, असे म्हटले होते. राऊस एव्हेन्यू न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी यावर्षी 30 एप्रिल रोजी सिसोदिया यांना जामीन नाकारला होता. सिसोदिया यांच्यामुळे खटला सुरू होण्यास विलंब होत असल्याचेही ट्रायल कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले होते.





