Newasa: नेवासा फाटा येथील प्रसिद्ध त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाचे सचिव मनीष घाडगेपाटील यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संस्थेचा राजीनामा देण्यासाठी आणि मालमत्ता नावावर करण्यासाठी खोट्या गुन्ह्यांची धमकी देऊन त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मनिष घाडगे यांच्या पत्नी मनीषा घाडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संस्थेच्या अध्यक्षांसह सहा जणांविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२५ पासून मनीष घाडगेपाटील यांच्यावर संस्थेचा राजीनामा देण्यासाठी दबाव टाकला जात होता. त्यांच्या नावावर असलेली वैयक्तिक मिळकत संस्थेच्या नावे करावी, यासाठी आरोपींनी त्यांना वारंवार मानसिक त्रास दिला. जर राजीनामा दिला नाही, तर खोट्या बदनामीच्या केसेस दाखल करून आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी देण्यात आली होती. या जाचाला कंटाळून २८ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. यांच्यावर झाला गुन्हा दाखल – मनीषा घाडगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी खालील सहा जणांवर गुन्हा नोंदवला आहे. १. सुमती साहेबराव घाडगेपाटील (अध्यक्षा, त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान) २. स्नेहल साहेबराव घाडगे (मुलगी) ३. श्रुती साहेबराव घाडगे (मुलगी) ४. चेतन चव्हाण (मोठा जावई) ५. सोपान बाजीराव काळे (प्राचार्य, रा. तेलकुडगाव) ६. अनुराधा उत्तम गोरे (समन्वयक, रा. जळके) “माझ्या पतीला पदाचा राजीनामा देण्यासाठी आणि त्यांची मालमत्ता बळकावण्यासाठी आरोपींनी खोट्या गुन्ह्यांच्या धमक्या दिल्या. सततच्या मानसिक छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली आहे.” — मनीषा मनीष घाडगे (फिर्यादी) शैक्षणिक क्षेत्रात खळबळ – त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल हे जिल्ह्यातील एक मोठे नाव आहे. मात्र, संस्थेच्या अंतर्गत वादातून आणि मालमत्तेच्या हव्यासापोटी एका उच्चशिक्षित सचिवावर आत्महत्येची वेळ आल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. संस्थेच्याच अध्यक्षा, त्यांच्या मुली आणि जावयावर गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. नेवासा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, संशयित आरोपींच्या अटकेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.