Manipur violence : इंडिया आघाडीने राष्ट्रपतींकडे मणिपूर प्रकरणात हस्तक्षेपाची केली मागणी

नवी दिल्ली :- विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मणिपूर मुद्द्यावर हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विरोधी पक्षांच्या वतीने राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडे वेळ मागितली होती. या भेटीत खर्गे आणि अन्य नेत्यांनी मणिपुरात झालेल्या भयानक हिंसाचाराची माहिती राष्ट्रपतींकडे सादर केली.
या प्रकरणात केंद्र सरकार मूग गिळून गप्प बसले असून संसदेत यावर चर्चाही होऊ दिली जात नाही, अशी तक्रारही त्यांनी केली. पंतप्रधानांनाही या प्रकरणात अद्याप कोणतेही निवेदन संसदेत केले नसल्याची माहिती राष्ट्रपतींना देण्यात आली.
29-30 जुलै रोजी मणिपूरला भेट देणारे विरोधी इंडिया आघाडीचे काही खासदारांचा राष्ट्रपतींना भेटलेल्या शिष्टमंडळात समावेश होता. संसदेत या प्रकरणात कलम 267 अन्वये तपशीलवार चर्चेची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे, पण सरकार अल्पकालीन चर्चेवर अडून बसले आहे.
मणिपूर प्रकरणात पंतप्रधानांनी संसदेत सविस्तर निवेदन करावे अशी मागणीही विरोधकांनी वारंवार केली आहे. सरकारकडून दाद दिली जात नसल्याने इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आज राष्ट्रपतींची भेट घेऊन आपली भूमिका त्यांच्याकडे मांडली आहे.





