Manipur violence : सर्व पक्षीय बैठकीत मणिपुर मधील स्थितीवर झाली चर्चा

नवी दिल्ली :- मणिपूरमधील हिंसाचार आणि तेथील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत भाजप, कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांसह विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते.
3 मे पासून राज्यात वांशिक हिंसाचार सुरू झाल्यापासून तेथे जवळपास 120 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि 3,000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या राज्यातील स्थितीवर चर्चा करण्यासाठी सर्व पक्षीय बैठक बोलावण्याची मागणी विरोधी पक्षांकडून सातत्याने करण्यात येत होते. त्यानुसार ही बैठक झाली.
या बैठकीला भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, मणिपूरचे माजी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग (कॉंग्रेस), डेरेक ओब्रायन (टीएमसी), मेघालयाचे मुख्यमंत्री कोनराड सिंग (एनपीपी), एम थंबी दुराई (एआयएडीएमके), तिरुची शिवा (डीएमके) , पिनाकी मिश्रा (बीजेडी), संजय सिंग (आप), मनोज झा (आरजेडी) आणि प्रियांका चतुर्वेदी (शिवसेना) हे प्रतिनिधी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, नित्यानंद राय आणि अजय कुमार मिश्रा, केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला आणि इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक तपन डेका हेही या बैठकीला उपस्थित होते.
अमित शहा यांनी गेल्या महिन्यात चार दिवस मणिपुर राज्याचा दौरा केला होता आणि राज्यात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात अनेक लोकांची भेट घेतली होती. 50 दिवस उलटूनही हिंसाचार थांबलेला नसल्यामुळे विरोधी पक्षांनी परिस्थिती हाताळल्याबद्दल सरकारवर टीका केली आहे.





