Manipur CM Resigns : मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांचा राजीनामा

नवी दिल्ली : मागील अनेक महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. मणिपूरचे राज्यपाल अजय भल्ला यांच्याकडे बिरेन सिंग यांनी राजीनामा सोपवला आहे. राजीनामा देण्याअगोदर त्यांनी भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. या भेटीवेळी यांच्यासोबत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रादेखील होते.
Manipur CM N Biren Singh hands over the letter of resignation from the post of Chief Minister to Governor Ajay Kumar Bhalla at the Raj Bhavan in Imphal. pic.twitter.com/zcfGNVdPPo
— ANI (@ANI) February 9, 2025
गेल्या वर्षी ३ मे रोजी मणिपूरमधील मैतेई समुदाय आणि कुकी समुदायामध्ये हिंसाचार सुरू झाला. मणिपूर उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध भारतीय आदिवासी विद्यार्थी संघाने एका रॅलीचे आयोजन केले होते. अनुसूचित जमातीच्या यादीत मणिपुरी समुदायाचा समावेश करण्याचा विचार करण्याचे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले होते. तेव्हापासून राज्यात हिंसाचार सुरूच आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारला निमलष्करी दल तैनात करावे लागले होते.
मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालय अलर्ट मोडवर गेले आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. काही दिवसांपूर्वी मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी राज्यातील हिंसाचाराबद्दल मणिपूर वासियांची माफीदेखील मागितली होती.





