ना कोकाटे, ना मुंडे… कृषी खातं आता पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ बड्या नेत्याकडे?

Maharashtra Politics : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खातं काढून घेतलं जाणार असून, त्यांना क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात ऑनलाइन रमी खेळतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, त्यांचं मंत्रिपद कायम ठेवत केवळ खातं बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
पडद्यामागील घडामोडी:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात नुकत्याच झालेल्या बैठकीत कोकाटेंकडून कृषी खातं काढून घेण्यावर एकमत झाल्याचे समजते. कोकाटेंचा थेट राजीनामा घेण्याऐवजी त्यांचे खातं बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सूत्रांनुसार, कोकाटेंना सध्या दत्तात्रय भरणे यांच्याकडे असलेलं क्रीडा आणि युवक कल्याण खातं दिलं जाण्याची शक्यता आहे, तर भरणे यांना कृषी खात्याची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप जाहीर झालेला नाही.
विरोधकांची भूमिका काय?:
रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली होती. आता त्यांचं खातं बदलण्याचा निर्णय घेतल्याने विरोधक यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोकाटेंच्या कृतीमुळे महायुती सरकारची प्रतिमा डागाळली असून, हा निर्णय सरकारला विरोधकांचा दबाव कमी करण्यासाठी उपाय ठरू शकतो.
धनंजय मुंडेंचेही प्रयत्न:
दरम्यान, माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी पुन्हा कृषी खातं मिळवण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू केल्याची चर्चा आहे. मुंडेंवर कृषी खात्यातील कथित आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप होते, परंतु मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना याप्रकरणी क्लीन चीट दिली आहे. यानंतर मुंडे यांनी सक्रियता वाढवली असून, 30 जुलै रोजी रात्री आणि 31 जुलै रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत दोन बैठका घेतल्या. आजच्या बैठकीला अजित पवारही उपस्थित होते. यामुळे मुंडेंचं नावही कृषी खात्यासाठी चर्चेत आहे. मात्र, त्यांच्यावरील अन्य प्रलंबित प्रकरणांमुळे त्यांना तातडीने ही जबाबदारी मिळण्याची शक्यता कमी मानली जात आहे.
दरम्यान, कोकाटेंकडून कृषी खातं काढून घेऊन त्यांना क्रीडा खातं देण्याचा निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. यासोबतच भरणे यांना कृषी खात्याची जबाबदारी मिळेल की मुंडेंना संधी मिळेल, याबाबत उत्सुकता आहे. या खातेबदलामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काही दिवस चर्चा रंगणार, हे निश्चित!





