माणिकराव कोकाटेंनी व्यक्त केली दिलगिरी; म्हणाले “तो शेतकरी माझा मित्र, थट्टा मस्करी…”

Manikrao Kokate | कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीच्या मुद्यावरून शेतकऱ्यांबाबत केलेले विधान वादात सापडले आहे. शेतकरी कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा, लग्न करतात असं विधान मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केल्यानंतर त्यांच्यावर राज्यभरातून टीका करण्यात आली. यानंतर आता कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त केली आहे.
“शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही असं मी म्हणालो नाही, तर शेतकऱ्यांना कायमस्वरुपी सक्षम करणं ही काळाची गरज आहे. शेतकरी समृद्ध कसा होईल, त्याचा भांडवली खर्च कसा कमी होईल, उत्पादनाचे मार्केटिंग कसे करता येईल यासाठी सरकार प्रयत्न करत आहे,” असे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.
‘शेतकऱ्यांना कर्ज काढण्याची वेळच येऊ नये ही सरकारची भावना’
पुढे ते म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. तिथे पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. मदत मिळणार नाही असे मी म्हणालो नाही. पण मदतीच्या पलिकडे जाऊन शेतकरी कर्जबाजारी होऊ नये यासाठी सरकार योजना आणणार आहे. शेतकऱ्यांना स्वत:च्या पायावर उभा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना कर्ज काढण्याची वेळच येऊ नये ही सरकारची भावना आहे.” Manikrao Kokate |
‘माझ्या वक्तव्याचा सगळ्या शेतकऱ्यांशी संबंध नाही’
याशिवाय त्यांनी केलेल्या विधानाबाबत स्पष्टीकरण देत सांगितले की, “कर्जमाफी होणार नाही असे मी कुठेही म्हणालो नाही. मी ज्या शेतकऱ्याशी बोलत होतो, तो माझा मित्र आहे. त्याच्याशी थट्टा मस्करीत मी बोलत होतो. माझ्या वक्तव्याचा सगळ्या शेतकऱ्यांशी संबंध नाही. व्यक्तिगत मित्राशी मी बोललो, त्याची मस्करी करत होतो,” असे कोकाटे म्हणाले. Manikrao Kokate |
नेमकं काय म्हणाले होते माणिकराव कोकाटे?
“कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात. त्या पैशांचं तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक आहे का? सरकार तुम्हाला शेतीमध्ये गुंतवण्यासाठी पैसे देणार आहे. तुम्हाला शेतीच्या पाईपलाईनसाठी, सिंचनासाठी पैसे मिळतात. सरकार भांडवली गुंतवणूक करतं आहे. भांडवली गुंतवणूक शेतकरी करतात का? शेतकरी म्हणतात की, पीक विम्याचे पैसे पाहिजेत. मग त्यातून साखरपुडे, लग्न करा,” असं विधान माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं. Manikrao Kokate |
हेही वाचा:





