निवडणुकांची तयारी सुरु ! पाकिस्तानात प्रमुख राजकीय पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध

नवी दिल्ली – पाकिस्तानमध्ये पुढील महिन्याच्या ८ तारखेला होणार् या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि पाकिस्तान मुस्लिम लीग- नवाझ गट या दोन प्रमुख राजकीय पक्षांनी आपले जाहीरनामे आज प्रसिद्ध केले.
नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग- नवाझ गटाच्या जाहीरनाम्यामध्ये पाकिस्तानची अर्थव्यवस्था सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. याशिवाय भारताबरोबर शांततेचे संबंध प्रस्थापित करणे आणि दहशतवादाबाबत शून्य सहिण्णूतेचे धोरण अवलंबण्यात येईल, असेही या जाहीरनाम्यामध्ये म्हटले आहे.
याशिवाय वातावरण बदल, जल सुरक्षेबाबत शून्य सहिष्णूतेचे धोरण अवलंबण्यात येईल. तसेच देशातील निर्यातीला प्रोत्साहन देऊन अर्थकारण सुरळीत करण्यावर लक्ष केंद्रीत केले जाईल, असेही या जाहीरनाम्यामध्ये म्हटले आहे. तर बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीने आपल्या जाहीरनाम्यामध्ये नवीन विचारांना निवडण्याचे आवाहन मतदारांना केले आहे. देशातील गरिबी, बेरोजगारी आणि महागाईचा मुकाबला करण्याचे धोरण केवळ पीपीपी या एकाच पक्षाने स्वीकारले असल्याचेही या जाहीरनाम्यामध्ये म्हटले आहे.
विकास, गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती वाढवून कष्टकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवण्याचे आश्वासन पक्षाने दिले आहे. किमान उत्पन्न दरवर्षी ८ टक्क्यांनी वाढवण्यात येईल. कष्टकरी आणि कनिष्ठ वर्गासाठीच्या सुविधा वाढवल्या जातील. त्यात आरोग्य, शिक्षण, अन्न सुरक्षा आणि महिला सबलीकरणाच्या सुविधांना महत्व दिले जाईल असेही म्हटले आहे. पक्षाचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी एक्सवर हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.





