सहा महिन्यांत 4 लाख सरकारी नोकऱ्या.. 25 लाखांचा आरोग्य विमा ! ‘या’ योजनांमुळे मध्य प्रदेश कॉंग्रेसचा जाहीरनामा चर्चेत

नवी दिल्ली – मध्य प्रदेश विधानसभा (MadhyaPradesh election) निवडणुकीसाठी कॉंग्रेसने (Congress) मंगळवारी आपला जाहीरनामा जारी केले आहे. कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात तरुण, शेतकरी (Farmer) आणि महिलांना मदत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कॉंग्रेसने आपल्या वचनपत्रात राज्यातील चार लाख रिक्त सरकारी पदे सहा महिन्यांत भरण्याचे आश्वासन दिले आहे.
यासोबतच सरकार स्थापन झाले तरच तरुणांसाठी स्वाभिमान योजना सुरू करण्याची चर्चाही आश्वासन पत्रात जोडण्यात आली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील पदवीधर तरुणांना दरमहा तीन हजार रुपये दिले जाणार आहेत. तर पदविकाधारकांना 1500 रुपये, तर दोन लाख तरुणांना कौशल्य प्रशिक्षणाद्वारे दरमहा 8 ते 10 हजार रुपये दिले जाणार आहेत. त्यासाठी युवा स्वाभिमान योजनेचे कार्ड देण्यात येणार आहे. (Congress Manifesto)
राज्यातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी कॉंग्रेस आपल्या जाहीरनाम्यात आणखी एक महत्त्वाची योजना घेऊन येत आहे, ज्याअंतर्गत राज्यातील प्रत्येक व्यक्तीला 25 लाख रुपयांपर्यंतचा आयोग्य विमा दिला जाईल. जेणेकरून राज्यातील प्रत्येक व्यक्तीला चांगले उपचार मिळू शकतील. कॉंग्रेसही आज वृद्धापकाळ पेन्शन वाढवण्याचे आश्वासन देणार आहे. यामध्ये वाढ करून 1500 रुपये करण्यात येणार आहेत.
कॉंग्रेसची प्रमुख आश्वासने अशी आहेत…
1. जय किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ
2. महिलांना दरमहा रु 1500 नारी सन्मान निधी
3. घरगुती गॅस सिलिंडर 500 मध्ये
4. इंदिरा गृह ज्योती योजनेंतर्गत, वीजेची 100 युनिट्स माफ; 200 युनिट्स अर्ध्या दरात
5. जुनी पेन्शन योजना 2005 सुरू करणार
6. शेतकऱ्यांना सिंचनासाठी 5 अश्वशक्तीची वीज मोफत
7. शेतकऱ्यांची थकीत वीजबिल माफ
8. शेतकरी आंदोलनाशी संबंधित खोटे व निराधार खटले मागे
9. दिव्यांग पेन्शनची रक्कम 2000 पर्यंत वाढवणार
10. जातनिहाय जनगणना करणार
11. सरकारी सेवा आणि योजनांत ओबीसींना 27 टक्के आरक्षण
12. सागर येथे संत शिरोमणी रविदास यांच्या नावाने स्किल अपग्रेडेशन विद्यापीठ
13. पढो-पढ़ाओ योजनेंतर्गत, सरकारी शाळेतील मुलांना दरमहा अनुदान
14. राज्यात शालेय शिक्षण मोफत





