Congress News : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. विरुधुनगरचे खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिकम टागोर यांनी पक्षाच्या राज्य निवडणूक व्यवस्थापन आणि समन्वय समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सत्ताधारी डीएमके सोबतच्या युतीत काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने टागोर नाराज होते. या युतीत काँग्रेसला केवळ २८ जागांवर समाधान मानावे लागले असून, त्यातील काही विद्यमान जागाही गमवाव्या लागल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसला मिळालेल्या काही जागा पूर्वी एआयएडीएमकेच्या प्रभावाखालील असल्याने त्या जिंकणे पक्षासाठी आव्हानात्मक ठरणार आहे. मणिकम टागोर हे युतीत काँग्रेसला अधिक जागा आणि सत्तेत मोठा वाटा मिळावा यासाठी प्रयत्नशील होते. मात्र, त्यांच्या अपेक्षेप्रमाणे निकाल न लागल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला. टागोर यांनी आपला राजीनामा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे सादर केला आहे. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दरम्यान, तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार असून ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील ही घडामोड पक्षासाठी धक्कादायक मानली जात आहे.