मणिशंकर अय्यर यांची कन्या अडचणीत ! माफी मागा अन्यथा घर सोडण्याची सोसायटीची सूचना

नवी दिल्ली – अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या विरोधात बोलणे आणि त्यासाठी उपवास ठेवणे सुरन्या अय्यर यांना अडचणीचे ठरले आहे. त्या ज्या सोसायटीत राहतात त्या सोसायटीने त्यांना तेथील घर सोडून जाण्यास सांगितले आहे. सुरन्या अय्यर या कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांच्या कन्या आहेत.
अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्यात आली असून तेथे रामललांची प्राणप्रतिष्ठाही झाली आहे. सुरन्या अय्यर यांनी त्याच्या विरोधात तीन दिवसांचा उपवास किंवा उपोषण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तसेच त्यांनी सनातन धर्माच्या विरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळेच जंगपुरा येथील ज्या आरडब्लूए सोसायटीत त्या राहतात त्या सोसायटीने त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. सोसायटीने सुरन्या यांना पत्र पाठवले असून त्यांनी माफी मागावी अशी सूचना त्यांना केली. मणिशंकर अय्यर यांनीही माफी मागावी असे सोसायटीने म्हटले आहे. सोसायटीच्या म्हणण्यानुसार दोघांनी एकतर माफी मागावी किंवा सोसायटी सोडून निघून जावे.
सुरन्या अय्यर यांचे काय म्हणणे आहे?
सुरन्या अय्यर यांनी या कारवाईच्या विरोधात फेसबुकवर एक निवेदन जारी केले आहे. माझ्या उपवासाच्या संदर्भात दूरचित्रवाहिनीवर दाखवलेल्या एका स्टोरीशी संबंधित हे निवेदन आहे. संबंधित रेसिडेंटस् वेलफेअर असोसिएशन अर्थात आरडब्लूए ज्या कॉलोनीत आहे त्या कॉलोनीत मी राहत नाही. दुसरे मी सध्या प्रसारमाध्यमांशी काहीही न बोलण्याचा निर्णय घेतला आहे कारण भारतातील माध्यमे हल्ली केवळ वीष आणि संभ्रम पसरवतात. मला तुम्ही सगळे ओळखतात. माझ्या आयुष्यातील आतापर्यंतची ५० वर्षे मी भारतातच व्यतित केली आहेत.
सर्व राजकीय विचारधारांच्या लोकांसोबत शिकले आहे, मोठी झाली आहे. त्यांच्यासोबत मी काम केले आहे, कार्यकर्ताही राहीली आहे. तुम्हाला हे वाचता यावे आणि शांतपणे या सगळ्याचा विचार करता यावा म्हणून फेसबुक आणि यूट्यूबवरच मी माझी भूमिका मांडणार आहे. मीडियाच्या सर्कशीपासून स्वत:ला वाचवण्याचा मी प्रयत्न करते आहे. कारण माझे असे मानणे आहे की भारतात आपल्याला अधिक चांगल्या पध्दतीने सार्वजनिक संवादाची आवश्यकता आहे. शीवीगाळ करण्यापेक्षा आपण काही विचार करण्याचा प्रयत्न करू, जयहींद असे सुरन्या अय्यर यांनी म्हटले आहे.
काय केले होते सुरन्या यांनी?
मणिशंकर अय्यर यांच्या कन्या सुरन्या अय्यर यांनी जेंव्हा अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत होता तेंव्हा उपवास केला होता. आपल्या मुस्लिम बांधवांसाठी आपण हे करत असल्याचे त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले होते. त्यांच्या या कृतीवर त्या जेथे राहतात तेथील लोक नाराज झाले होते आणि त्यांनी सुरन्या यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.



