प्राणप्रतिष्ठेमुळे मोदींना नुकसानच.. शंकराचार्यांची नाराजी भोवणार ! मणिशंकर अय्यर यांचा सूचक इशारा

नवी दिल्ली- अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केल्याने खुद्द पंतप्रधान मोदींचे मोठे नुकसान होईल. हिंदू धर्मातील शंकराचार्यांची नाराजी त्यांना भोवेल, असे प्रतिपादन माजी केंद्रिय मंत्री आणि काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केले आहे.
मणिशंकर अय्यर केरळ लिटरेचर फेस्टिव्हलच्या सातव्या आवृत्तीत सहभागी झाले आहेत. यावेळी ते म्हणाले की, ‘मोदींनी स्वतः राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित राहून धार्मिक विधी करणार असल्याबद्दल चार शंकराचार्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हिंदू धर्मात शंकराचार्यांना खूप वरचे स्थान आहे.
आजवर बहुतेक हिंदूंनी कधीही हिंदुत्वाला मत दिलेले नाही. गेल्या दहा वर्षांपासून हिंदुत्ववादी लोक सत्तेत असल्याने भलत्याच मुद्यावर मते मागण्याची पद्धत पडली आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच ही प्राणप्रतिष्ठेची घाई करण्यात येत आहे, हे देशातल्या सर्वांनाच कळून चुकले आहे.
अय्यर म्हणाले की हिंदू धर्म हा भारतातील सर्वात जुना धर्म आहे आणि देशातील बहुसंख्य समाज त्याचे पालन करतो. तर हिंदुत्व हे एक राजकीय तत्वज्ञान आहे. वास्तविक, उत्तराखंडमधील ज्योतिर्मठचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमात चारही शंकराचार्य सहभागी होणार नसल्याचा दावा केला जात आहे. ते म्हणतात की, मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच अभिषेक केला जात आहे, जे शास्त्रानुसार योग्य नाही.





