Mango Pickle: उन्हाळा आला की घराघरांत कैरीच्या लोणच्याचा सुगंध दरवळू लागतो. भारतीय जेवणात लोणच्याला खास स्थान आहे. साध वरण-भात, खिचडी, पराठा असो, कैरीचं लोणचं जेवणाची चव अनेक पटींनी वाढवतं. मात्र लोणचं करताना योग्य काळजी घेतली नाही, तर ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे चवदार आणि वर्षभर टिकणारं लोणचं बनवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोणच्यासाठी योग्य कैरीची निवड. प्रत्येक आंबा लोणच्यासाठी योग्य नसतो. लोणच्यासाठी कच्ची, घट्ट, आंबट आणि डागरहित कैरी निवडावी. कैरीमध्ये कोय पूर्णपणे तयार झालेली असावी. खूप गोड किंवा खूप आंबट कैरी टाळावी. तसेच पडलेली, कापलेली कैरी वापरू नये. मध्यम आकाराची आणि रस नसलेली कैरी लोणच्यासाठी उत्तम मानली जाते. कैरी कापताना ती करकरीत आणि घट्ट असणं गरजेचं आहे. त्यामुळे मसाला कैरीला चांगला लागतो. कैरीचं लोणचं बनवण्यासाठी लागणारे साहित्यही अगदी साधं असतं. यासाठी ५०० ग्रॅम कच्ची कैरी, मोहरी, मीठ, हळद, तिखट, मोहरीचं तेल, जिरे, धणे, बडीशेप, कलौंजी आणि हिंग लागते. प्रत्येक घरात मसाल्याचं प्रमाण थोडंफार बदलतं, त्यामुळे लोणच्याची चवही वेगळी असते. लोणचं बनवताना प्रथम कैरी स्वच्छ धुवून पूर्ण कोरडी करून घ्यावी. त्यानंतर तिचे लहान तुकडे करावेत. त्यात मीठ, हळद आणि तिखट घालून सर्व मिश्रण चांगलं एकत्र करावं. हे मिश्रण २ ते ३ तास उन्हात ठेवावं. त्यामुळे कैरीमध्ये मीठ व्यवस्थित मुरतं. Mango Pickle यानंतर मोहरी, धणे आणि जिरे हलके भाजून जाडसर वाटून घ्यावेत. हे मसाले कैरीमध्ये मिसळावेत. बडीशेप आणि कलौंजी थोडी भाजून तशीच घालावी. त्यानंतर मोहरीचं तेल चांगलं तापवून घ्यावं आणि त्यात हिंग टाकावा. हे गरम तेल लोणच्यात घालून सर्व मिश्रण नीट हलवावं. लोणचं तयार झाल्यावर ते काचेच्या बरणीत भरून उन्हात ठेवावं. दररोज बरणी हलवावी, त्यामुळे मसाले सगळीकडे समान लागतात. साधारण ७ ते १० दिवसांत लोणचं खाण्यासाठी तयार होतं. लोणचं वर्षभर टिकवायचं असेल, तर एक खास उपाय खूप उपयोगी ठरतो. मोहरीचं तेल गरम करून त्यात हिंग घालून ते लोणच्यात मिसळावं. यामुळे लोणच्याची चव वाढते आणि ते लवकर खराबही होत नाही. काही जण लोणचं जास्त दिवस टिकावं म्हणून त्यात थोडासा व्हिनेगरही वापरतात. योग्य कैरी, योग्य मसाले आणि थोडी काळजी घेतली, तर घरगुती कैरीचं लोणचं वर्षभर चव कायम ठेवू शकतं.