पुणे | मांगल्यपर्वाचा आज “श्रीगणेशा’

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – देवा तूंचि गणेशु । सकलमति प्रकाशु ।। अशी प्रार्थना करून ज्या गणाधीशाला संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांनी आवाहन केले, त्या श्रीगणेशाचा उत्सव काही तासांवर आला आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी घरोघरी पूर्ण झाली असून, आता प्रतीक्षा केवळ बाप्पा घरी विराजमान होण्याची आहे.
पुण्यात गणेशोत्सवाची वैभवशाली परंपरा आहे. या परंपरेला साजेसा गणेशोत्सव पुण्यात जल्लोषात साजरा केला जातो. याची तयारी महिना-दोन महिने आधीपासूनच सुरू होते, त्यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण असते.
घरोघरी बाप्पांचे आगमन होतेच परंतु शहरात गल्लोगल्ली, रस्तोरस्ती असलेल्या गणेशमंडळांच्या मंडपातही बाप्पा विराजमान होतात. या मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही आता गणेश आगमनाची तयारी पूर्ण केली आहे.
आरास आदी गोष्टींची तयारी काही दिवस आधी झाली असली तरी, फुले, फळे, हार, दुर्वा, आगाडा, तुळशी, शमीपत्रे, बेलपत्रे, केवडा, कमळफूल आदी गोष्टींची खरेदी ही एक दिवस आधीच करावी लागते. त्यामुळे या खरेदीसाठी मंडईमध्ये भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. याशिवाय पेढ्यांचे मोदक आणि अन्य पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठीही बाजारपेठ फुलून गेली होती.
मंडळांनीही आरासाची तयारी पूर्ण केली आहे. विविध मान्यवरांच्या हस्ते गणेशाची प्रतिष्ठापना आणि मुहूर्तवेळ ठरवण्यात आली आहे. तसेच सेलिब्रेटींच्या हस्ते आरासाचे उद्घाटनही निश्चित केले आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच ही आरास भाविकांना पाहता येणार आहे.
दुपारी १.५१ मिनिटांपर्यंत मुहूर्त
गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४ वाजून ४० मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ५१ मिनिटांपर्यंत मुहूर्त आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना मध्यान्हीनंतरही करता येणार आहे.




