पुणे जिल्हा | वाखरीत लाखो वैष्णवांची मांदियाळी

वाखरी, (वार्ताहर) –
संत संगतीचे काय सांगु सुख ।
आपणा पारिखे नाही जेथ ॥
साधु थोर जाणा साधु थोर जाणा ।
साधु थोर जाणा कलियुगी ॥
संत नामदेव महाराजांच्या या अभंगात संत संगतीच्या सुखाचे सुरेख वर्णन केले आहे. संतसंगतीमुळे मानवाच्या जीवनात सार्थकता येते. शुद्ध आचरण तयार होऊन पारमार्थिक ओढ लागते. कारण संताचा सहवास हा चंदना पेक्षाही शीतल असतो.
साधू संता इतके दुसरे दैवत नाही हे ओळखून गेली महिनाभर महाराष्ट्रासह इतर प्रांतातून व परदेशातून ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता संतांसमवेत टाळ-मृदंंगाच्या गजरात व विठ्ठल नामाच्या जयघोषात पंढरीश पांडुरंगरायाच्या भेटीच्या ओढीने निघालेली लाखो वैष्णवांची मांदियाळी सोमवारी (दि.15) शेवटच्या गोल रिंगणानंतर वाखरी मुक्कामी विसावली. मंगळवारी (दि. 16) हा वैष्णवांचा महासागर पंढरीत चंद्रभागेत विलीन होइल व चंद्रभागेस भक्तांचा महापूर येइल .
भंडीशेगांव मुक्कामी पहाटे सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ यांच्या हस्ते माऊलींची विधीवत पूजा करण्यात आली तर पिराची कुरोली येथे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांची महापूजा करण्यात आली. दिवसभर संतांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. कांदेनवमीच्या निमित्ताने पालखी तळावर दिंड्यादिंड्यांमध्ये कांदेनवमी साजरी करण्यात आली. दुपारचे भोजन घेवून हे सोहळे शेवटच्या वाखरी मुक्कामाकडे मार्गस्थ झाले.
दुपारी 3 वाजता संत ज्ञानेश्वर महाराज तर सायंकाळी 4 वाजता संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे उभ्या रिंगणासाठी बाजीराव विहीर येथे पोहोचले. उभ्या रिंगणासाठी अश्व सज्ज झाले. हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी लाखो वैष्णवांनी गर्दी केली होती . अश्वांची दौड सुरू झाली. देवाचा व स्वराचा अश्व पाठीमागे 20 दिंड्यापर्यंत जाऊन परत सोहळ्याच्या अग्रभागी जाऊन पोहोचले. उभ्या रिंगणानंतर आरती झाली.
माऊलींच्या उभ्या रिंगणानंतर शेजारच्याच मोकळ्या शेतात गोल रिंगणासाठी पालखी सोहळा आणण्यात आला. पोलिसांनी उत्तम तर्हेने रिंगण आखून घेतले होते. त्यामुळे कोणतीही गैरसोय झाली नाही. या आखीव रेखीव रिंगणावर गोल रिंगणाला सुरूवात झाली. सुरूवातीला माऊलींचा व स्वाराचा अश्व रिंगणाच्या मध्यभागी आणण्यात आला.
त्यानंतर पताकाधारी व माऊलींची पालखी दिंड्यांसमवेत एक प्रदक्षणा पूर्ण करून रिंगणाच्या मध्यभागी आणण्यात आली. सायंकाळी 5.15 वाजता जरी पटक्याचा भोपळे दिंडीचा ध्वज रिंगणात धावण्यासाठी सोडण्यात आला. त्याने 3 प्रदक्षणा पूर्ण केल्या. त्यानंतर स्वाराच्या अश्वासह माऊलीच्या अश्वाने लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत नेत्रदिपक दौड करून 2 प्रदक्षणा पूर्ण केल्या.
यावेळी उपस्थितीत भाविकांनी माऊलीऽ माऊलीऽऽ नामाचा जयघोष करीत रिंगण सोहळ्याचा आनंद घेतला. रिंगणानंतर दिंड्यादिंड्यामध्ये उडीचे खेळ रंगले. लाखो वैष्णव या खेळात रंगून गेले. माउलींचा गोल रिंगण सोहळा सुरु असतानाच रस्त्यावर तुकोबाराय व सोपानदेव यांच्या उभ्या रिंगणाचा सोहळा अत्यंत उत्साही व भक्तीमय वातावरणात पार पडला. उडीच्या खेळानंतर हे सोहळे वाखरीकडे मार्गस्थ झाले. समाज आरतीनंतर ते वाखरीत विसावले.
पालख्या आज पंढरीत
सर्व संतांच्या पालख्या मंगळवारी (दि. 16) या वाखरीतून पंढरपूरकडे विठ्ठलाच्या भेटीसाठी मार्गस्थ होणार आहेत. विसावा पादुका येथे तुकोबा व माऊलींच्या पालखी सोहळ्यातील शेवटचे उभे रिंगण होणार आहे. त्यानंतर आरती होईल. माऊलींच्या पादुका या श्रीमंत ऊर्जीतसिंह शितोळे सरकार यांच्या गळ्यात दिल्या जातील व त्या पंढरपूरातील ज्ञानेश्वर मंदिरात नेल्या जातील.





