पिंपरी – मावळ तालुक्यातील शिवणे येथील मंडल अधिकारी आणि त्याच्या एका खासगी साथीदाराला दोन लाख दहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि. १५) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्पाइन रोडवर करण्यात आली. मारुती महादेव चोरमले (वय ५३, मंडल अधिकारी, शिवणे) आणि जयेश बाळासाहेब बारमुख (वय ३३, रा. चांदखेड, मावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी ४६ वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराच्या बहिणीसह २१ जणांनी कुसगाव, मावळ येथील ३८ गुंठे जमीन बांधकाम व्यावसायिकाकडून करारनाम्याने विकत घेतली होती. मात्र, त्याच जमिनीची दुसऱ्याशी विक्री झाल्याने फेरफाराच्या प्रक्रियेत वाद निर्माण झाला. या फेरफारामध्ये तक्रारदाराच्या बाजूने निर्णय देण्यासाठी मंडल अधिकारी चोरमले याने दोन लाखांची लाच मागितली होती. बारमुख याने स्वतःसाठी १० हजार रुपये मागितले होते. तक्रारीनुसार एसीबीने सापळा रचून मंगळवारी स्पाइन रोडवरील एका रुग्णालयासमोर दोघांनाही लाच घेताना अटक केली. चोरमले याने दोन लाख रुपये रोख स्वरूपात, तर बारमुख याने १० हजार रुपये ऑनलाइन माध्यमातून स्वीकारले. एसीबीचे सहायक पोलीस आयुक्त दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.