चिंचवडगावातील मंडई उद्यापासून सुरू होणार…

पिंपरी(प्रतिनिधी) – आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेने चिंचवडगावातील भाजी मंडई सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मंगळवारपासून (दि. 2) ही मंडई सुरू करण्यात येणार आहे.
“करोना’च्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने चिंचवडगाव येथील भाजी मंडई चितराव गणपती मंदिर येथील मोकळ्या मैदानात स्थलांतरित केली होती. मात्र ही जागा गैरसोयीची व लांब असल्याने ग्राहकांनी या मंडईकडे पाठ फिरवली होती. पावसाळ्यात या जागेत चिखल होणार असल्याने तसेच पावसामुळे भाज्या खराब होण्याची भीती येथील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. तसेच ही मंडई पूर्वीप्रमाणे पुन्हा चिंचवड गावात सुरू करावी, अशी मागणी स्थानिक नगरसेविका अश्विनी गजानन चिंचवडे यांनी महापालिकेकडे केली.
सोमवारी दुपारी महापालिका भवनामध्ये अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्यासोबत चिंचवड भाजी मंडईतील व्यापाऱ्यांची एक बैठक झाली. या बैठकीला नगरसेविका अश्विनी चिंचवडे, भाजी मंडईचे अध्यक्ष अतुल पडवळ, बाळासाहेब गुंजाळ, सागर गरूड उपस्थित होते. पी-1, पी-2 याप्रमाणे एका दिवशी एकाच लाईनमधील गाळे सुरू राहणार आहेत. तसेच एका मंडईच्या एका बाजूने प्रवेश देण्यात येणार असून दुसऱ्या बाजूने ग्राहकांना बाहेर जाण्याचा रस्ता ठेवण्यात येणार आहे.
मंडईमध्ये प्रवेश करताना प्रत्येक नागरिकाच्या शरीराचे तापमान मोजण्यात येणार आहे. सॅनिटायझर हात स्वच्छ केल्यानंतरच ग्राहकांना मंडईत प्रवेश दिला जाणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आल्यास मंडई पुन्हा बंद करण्यात येईल, असा इशारा अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी मंडईतील व्यापाऱ्यांना लेखी पत्राद्वारे दिला आहे. मंडई सुरू ठेवण्याची परवानगी 30 जूनपर्यंत असणार आहे.





