Manchar Sub District Hospital: ग्रामीण भागासाठी वरदान! तांबडेमळा येथे २०० खाटांचे अद्ययावत रुग्णालय
Manchar Sub District Hospital:वाढती रुग्णसंख्या आणि अपुऱ्या जागेवर तोडगा; तांबडेमळा येथे २५९ नवीन पदांच्या मंजुरीसह आरोग्य व्यवस्था होणार अधिक सक्षम.

Manchar Sub District Hospital – आंबेगाव तालुक्यातील मंचरजवळील तांबडेमळा येथे 100 खाटांच्या सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून 200 खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला असून नव्या रुग्णालयासाठी डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, सफाई कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी आदींसह एकूण 259 पदांना मान्यता देण्यात आल्याची माहिती माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
आंबेगाव तालुक्यासह जुन्नर, शिरूर आणि परिसरातील नागरिकांना आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तांबडेमळा येथे हे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात येत आहे. सध्याच्या मंचर उपजिल्हा रुग्णालयातील अपुरी जागा आणि वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन प्रशस्त जागेवर अत्याधुनिक सुविधा असलेले रुग्णालय साकारले जात आहे. नवीन रुग्णालयात अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्ष, अतिदक्षता विभाग (आयसीयू), अपघात व आपत्कालीन सेवा, प्रसूतिगृह, बालरोग विभाग, नेत्ररोग विभाग, क्ष-किरण, सोनोग्राफी,
सुसज्ज प्रयोगशाळा तसेच विविध तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी आवश्यक वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि इतर कर्मचार्यांची पदनिर्मितीही करण्यात आली असून त्यामुळे रुग्णसेवा अधिक सक्षम आणि प्रभावी होणार आहे. या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील लाखो नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यास मदत होणार आहे. तसेच गंभीर रुग्णांना उपचारासाठी पुणे शहरात हलविण्याचे प्रमाण कमी होऊन ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.





