प्रभात वृत्तसेवा मंचर – बिबट्याच्या वाढत्या उपद्रवामुळे निर्माण झालेल्या समस्येवर शाश्वत उपाययोजना म्हणून बिबट्या नसबंदी कायदा आणण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. सध्याच्या कायद्यामध्ये बिबट्यांची नसबंदी करण्याची तरतूद नाही.त्यामुळे राज्य सरकारने यासंबंधीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला असून तो मंजूर करून घेण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे,अशी माहिती माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवार, दि. १२ रोजी दिली.पिंपरखेड (ता.शिरूर) येथील बालिका शिवन्या बोंबे हिच्यावर बिबट्याने हल्ला केल्यामुळे तिचे निधन झाले. मंचर उपजिल्हा रुग्णालयात तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आणला असता तेथे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, बिबट्याच्या विषयावर तातडीने बैठक घेऊन मार्ग काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी देखील चर्चा करण्यात आली आहे.उत्तर पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये बिबट्या-मानवी संघर्षामुळे भीतीचे आणि दहशतीचे वातावरण आहे.शेतकरी आणि त्यांच्या पशुधनावर होणारे हल्ले ही अत्यंत गंभीर बाब आहे.यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासनाच्या स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर, मलठण येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सुरक्षेसाठी आणि बिबट्या पकडण्यासाठी आवश्यक असलेल्या पिंजऱ्यांच्या व्यवस्थेकरिता तातडीने दोन कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची घोषणा अजित पवार यांनी केली. यामध्ये सुमारे २०० पिंजऱ्यांची व्यवस्था केली जाईल, तसेच, वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने खबरदारीच्या उपाययोजना लागू करण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.