Manchar News : फक्त नफा नाही, सामाजिक बांधिलकीही महत्त्वाची; दिलीप वळसे पाटलांकडून भैरवनाथ पतसंस्थेच्या कार्याचे कौतुक

प्रभात वृत्तसेवा
मंचर – क्षेत्र कोणतेही असो त्यात व्यावसायिक स्पर्धा ही ठरलेली असते; मात्र व्यवसाय करत असताना केवळ नफा कमावणे हाच उद्देश डोळ्यासमोर न ठेवता सामाजिक बांधिलकी जपणे हे देखील सहकारी संस्थेचे कर्तव्य आहे. ही सामाजिक बांधिलकी भैरवनाथ पतसंस्थेने जपली आहे. त्यामुळे भैरवनाथ पतसंस्थेचे कार्य इतर सहकारी संस्थांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथील भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या डिंभे येथील शाखेचे नवीन जागेत स्थलांतर प्रसंगी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते. यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून आदरांजली अर्पण करण्यात आली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, उपाध्यक्ष सागर काजळे, संस्थेच्या संचालिका कल्पनाताई आढळराव पाटील, संचालक हनुमंत तागड, महेश ढमढेरे, योगेश बाणखेले,
भिकाजी बोकड, अशोक गव्हाणे, माजी सभापती संजय गवारी, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश घोलप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विष्णूकाका हिंगे, संचालक प्रदीप आमुंडकर, सरपंच मयुरी लोहकरे, उपसरपंच शुभांगी राक्षे, तंटामुक्ती अध्यक्ष रामदास राक्षे,शैलेश आढळराव यांच्या सह संस्थेचे सभासद, ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन अमोल अंकुश तर संचालक महेश ढमढेरे यांनी आभार मानले.
सभासद, ग्राहकहिताचा विचार
आढळराव पाटील म्हणाले, भैरवनाथ पतसंस्थेने नेहमीच सभासदांच्या व ग्राहकांच्या हिताचा विचार केला आहे. सुशिक्षित व बेरोजगार तरुणांना, महिलांना विविध उद्योग व्यवसायासाठी संस्थेने कमीत कमी कालावधीत व अत्यल्प व्याजदरात कर्ज पुरवठा केला आहे. केवळ नफा कमावणे हाच उद्देश डोळ्यासमोर न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत संस्थेने नेहमीच सर्वसामान्यांना मदतीचा हात दिला असून या पुढील काळातही हे कार्य असेच सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे म्हणाले संस्थेचा स्वानिधी 62 कोटी रुपयांचा असून संस्थेकडे 560 कोटी रुपयांच्या आहेत.संस्थेने 450 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. तर संस्थेची गुंतवणूक 170 कोटी इतकी आहे. संस्थेचा संमिश्र व्यवसाय 1030 कोटी रुपयांचा आहे. संस्थेच्या मुख्यालयासहित 17 शाखांचे कामकाज सीबीएस पद्धतीने सुरू असल्याची माहिती यांनी दिली.





