प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर प्रथमच नगरपंचायत निवडणूक होत असल्याने राजकीय वातावरण रंगले आहे.पहिल्या नगराध्यक्षपदाचा मान मिळवण्यासाठी अनेक इच्छुकांनी कंबर कसली असून, ओबीसी महिला राखीव पद आल्यामुळे समीकरणांमध्ये मोठे बदल झाले आहेत.अनेक स्थानिक नेत्यांनी आपापल्या पत्नींना उमेदवार म्हणून पुढे करण्याचे धोरण स्वीकारले आहे.महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांतर्गत जागावाटपाच्या चर्चांना वेग आला असून, कोणाला किती जागा आणि कोणत्या प्रभागात मिळणार यावरून तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्यांच्या नेत्यांची ‘दिवाळी’ राजकारणात व्यस्त जाणार आहे. दरम्यान, नगरसेवक पदासाठी इच्छुकांनी स्थानिक मतदारांशी संपर्क साधत प्रचारयंत्रणा सुरू केली असून, सोशल मीडियावरही प्रचाराचे वारे सुरू झाले आहेत. स्थानिक नागरिकांमध्ये मात्र पहिल्याच नगराध्यक्ष आणि नगरसेवकांकडून अपेक्षा मोठ्या आहेत.विकास, स्वच्छता आणि वाहतुकीच्या समस्या सोडविण्याबाबत चर्चा रंगत आहे.मंचर येथील मतदार नूतन कानसकर म्हणाल्या, “पहिली निवडणूक असल्याने प्रत्येक उमेदवाराकडे आशेने पाहतोय. गावाचा सर्वांगीण विकास करणाऱ्या व्यक्तीलाच आम्ही पाठिंबा देऊ.” “पहिल्या नगरपंचायत निवडणुकीत मंचरकरांमध्ये उत्सुकता वाढली आहे.मतदारांचे म्हणणे, “विकास आणि स्वच्छतेवर काम करणाऱ्या उमेदवारालाच आम्ही नगराध्यक्षपदी पाहू इच्छितो. बदलाची वेळ आली आहे.” -सुनीताताई एरंडे, गृहिणी, मंचर.