प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायत निवडणुकीची तयारी सुरू असून, यंदाच्या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी योग्य आणि सक्षम उमेदवारांची वाणवा भासू लागली आहे. सक्षम उमेदवारांची टंचाई निर्माण झाली असून उमेदवार शोधण्यासाठी विविध पक्षांची धांदल उडाली आहे.महायुती असो वा महाविकास आघाडी, दोन्ही आघाड्यांमध्ये उमेदवार शोधाशोध मोहीम सुरू झाली आहे.पक्षनिष्ठा, लोकसंवाद आणि समाजसेवेचा अनुभव असलेले उमेदवार कमी असल्याने स्थानिक नेत्यांची डोके दुखू होऊ लागली. राजकीय पक्ष अशा व्यक्तींचा शोध आहे.ज्यांच्या मागे भावकी, समाजातील पाठबळ आणि मित्रपरिवाराचा मजबूत आधार आहे.मात्र समाजात चांगल्या पद्धतीने काम करणारे काही उत्साही कार्यकर्ते असूनही त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने निवडणुकीचा खर्च उचलणे त्यांच्यासाठी अवघड ठरत आहे.राजकीय पक्षांतर्फे मतदारसंघनिहाय बैठकांचे सत्र सुरू असून संभाव्य उमेदवारांचे गणित मांडले जात आहे. तर दुसरीकडे स्थानिक स्तरावर अनेक तरुण, महिला आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरायची तयारी दर्शवत आहेत.मात्र निवडणुकीतील खर्च, प्रचारयंत्रणा आणि मतदारांशी संपर्क साधण्याची जबाबदारी ही मोठी असल्याने अनेक जण मागे हटत आहेत.यामुळे मंचर नगरपंचायत निवडणुकीत “योग्य पण आर्थिकदृष्ट्या कमजोर” आणि “संपन्न पण जनाधार नसलेले” अशा दोन टोकांच्या उमेदवारांमध्येच पक्षांना निवड करावी लागणार असल्याची चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात रंगली आहे.