मनोज घोरपडेंच्या उमेदवारीचे सुतोवाच
मनोज घोरपडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मनोज घोरपडे यांना जवळ घेऊन मिठी मारली. मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या गळ्यातील हार काढून तो मनोज घोरपडे यांच्या गळ्यात घालताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या कृतीने घोरपडे यांच्या उमेदवारीचे सुतोवाच केले, अशी चर्चा मतदारसंघात आहे.
कामेरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपची महाजनादेश यात्रा रविवारी रात्री उशिरा नागठाणे येथे दाखल झाल्यावर कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील भाजप नेते मनोज घोरपडे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी यात्रेचे दणक्यात स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मनोज घोरपडे यांना पुष्पहार घालून मतदारसंघातील उमेदवारीची माळच त्यांच्या गळ्यात घातल्याची चर्चा आहे.
भाजपची महाजनादेश यात्रा दुपारी 4 वाजता यात्रा नागठाणे येथे येणार होती; परंतु यात्रा रात्री 9 वाजता नागठाणे येथील स्टॅंड चौकात दाखल झाली. इतका उशीर होऊनही नागठाणे व वर्णे जिल्हा परिषद गटातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. यात्रेच्या मागे मोटारसायकली रॅली होती. फटाक्यांच्या आतषबाजीत यात्रेचे स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी मनोज घोरपडे यांना खांद्यावरून उचलून व्यासपीठाकडे नेले. त्यावेळी “एकच दादा मनोजदादा’ अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. मनोज घोरपडे यांनी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्यावतीने मुख्यमंत्र्यांचे पुष्पहार घालून जंगी स्वागत केले.
मुख्यमंत्री म्हणाले, महायुती शासनाने आतापर्यंतच्या पाच वर्षांत केलेली विकासकामे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि भविष्यात करण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांसाठी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आज येथे आलो आहे. खरे तर मला येथे जास्त वेळ द्यायचा होता; परंतु सातारा येथील सभेला झालेला उशीर आणि कराडला असलेल्या सभेमुळे जास्त वेळ देता येत नाही; परंतु रात्री उशिरापर्यंत थांबलेल्या कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो.
यावेळी महाजनांदेश यात्रेचे प्रमुख सुजितसिंह ठाकूर, भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, ना. गिरीश महाजन, प्रदेश कार्यकारिणी सदस्य भरत पाटील, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सुरेश पाटील, जितेंद्र पवार, जिल्हा परिषद सदस्या भाग्यश्री मोहिते, पंचायत समिती सदस्य विजया गुरव, संजय घोरपडे, विकास गायकवाड, धनाजी जाधव, अमोल पवार, भाजपचे कराड उत्तरमधील पदाधिकारी उपस्थित होते.