सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पाच महिलांना चिरडणाऱ्यास बेड्या

राजगुरूनगर (प्रतिनिधी) – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर शिरोली, (ता. खेड) परिसरात खरपुडी फाट्यावर सोमवारी (दि. 13) रात्री साडेदहाच्या सुमारास 17 महिलांच्या अंगावर गाडी घालून पाच महिलांना चिरडणाऱ्या कारचालकाला खेड पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारचालकास अटक करण्यात खेड पोलिसांना यश आले आहे.
कानिफनाथ बबन कड (रा. वाकी, ता.खेड) असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. सोमवारी (दि. 13) रात्री साडेदहाच्या सुमारास शिरोली येथे खरपुडी फाट्यावर 17 महिला घोळक्याने रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी भरधाववेगाने आलेला कडने या महिलांना चिरडून तो कारसह फारर झाला होता.
दरम्यान, तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघात करणाऱ्या वाहनचालकाबाबत कोणतीही माहीती उपलब्ध होत नव्हती. पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अपर अधीक्षक मितेश घटे, उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी अज्ञात वाहनाचा व चालकाचा शोध घेणे कामी पाच टीम तयार करून पाठवल्या होत्या.
अपघात घडलेल्या ठिकाणापासून चारही दिशांना रवाना केल्या. या अपघाताच्या गुन्ह्याचा शोध घेत कसोशीने प्रयत्न करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व खबऱ्याकडून अधिक माहिती घेऊन योग्य माग काढून हा अपघात करणाऱ्यास बेड्या ठोकल्या. तसेच अपघातातील लपवून ठेवलेली महिंद्रा केव्हियु 100 (एमएच 14 एफएस 9033) ही हेद्रुंज येथुन ताब्यात घेतली आहे.
पोलीस निरिक्षक राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी तथा सहायक निरीक्षक नवनाथ रानगट, सहायक निरीक्षक राहुल लाड, उपनिरीक्षक भारत भोसले, ज्ञानेश्वर राऊत, पोलीस शिपाई कैलास कड, शंकर भवारी, संतोष मोरे, बाळकृष्ण साबळे, मोहन अवघडे, विजय राहातेकर, सचिन जतकर, प्रवीण गेंगजे, शेखर भोईर, योगेश भंडारे, सागर शिंगाडे, रमेश दाते, कोमल सोनुने, सोमनाथ गव्हाणे, सुनील बांडे या अधिकारी व अंमलदार यांनी ही कारवाई केली.
अपघात करून संबंधित चालक पळून गेला, त्याने गाडी लपवून ठेवली. चालकाला ताब्यात घेतल्यानंतर लपवून ठेवलेली गाडी आणि आरोपीला ताब्यात घेतले. खरपुडी फाट्याजवळ नियमित होणारे अपघात टाळण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी बैठक घेवून तीव्र उताराच्या वर गतिरोधक टाकण्याचे नियोजन व अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
– राजकुमार केंद्रे, निरीक्षक, खेड पोलीस





