‘मन की बात विचार करून करावी लागते…’; उद्धव ठाकरेंनी साधला PM मोदींवर निशाणा

Uddhav Thackeray – मन की बात ही विचार करून करावी लागते. मात्र दिल की बात हीच खरी असते आणि आज तुम्ही लोकांनी माझ्यासोबत केलेली ही दिल की बात होती, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी थेट मोदींवर निशाणा साधला आहे. त्यासोबतच त्यांनी बाळासाहेबांनी प्रमोद महाजनांना सांगितलेल्या विधानाचीही आठवण करून दिली आहे.
ठाकरे म्हणाले की, बाळासाहेबांनी सांगितले होते, एक दिवस मतदार हा केवळ हिंदू म्हणून मतदान करणार. आज ते होतांना दिसतेय आणि त्याचा कोण, कशाप्रकारे फायदा किंवा वापर करून घेत आहे, ते देखील आपण पाहत आहोत. पुढे बोलतांना ठाकरे म्हणाले, बाळासाहेबांनी सांगितलेले आज खरे ठरतेय.
मात्र भाकरी एकाने भाजली आणि त्या भाजलेल्या भाकरीवर आज कुणी दुसरेच पोट भरत आहेत. तुमच्या हातात जो भगवा आहे. त्या भगव्यात कोणताही फरक नाही. जाहीरातीत फरक करून रंगात फरक दाखवला जावू शकतो. मात्र या भगव्यात कोणताही फरक नाही. मग तो भगवा हा कोणाच्याही हातात असू द्या, भगवा हा भगवाच असल्याचे ठाकरे म्हणाले.
मातोश्रीवर अनेक लोक मदत मागायला आले
मातोश्रीवर अनेक लोक स्वतःला वाचवण्यासाठी मदत मागायला आले होते. मात्र त्यावेळी बाळासाहेबांनी त्यांना साथ दिली. कारण हे त्यांनाच पुढे चालून संपवण्याचा प्रयत्न करतील, याचा त्यांनी विचार केला नव्हता.
त्यांना आधार दिला, धीर दिला तीच लोक आज पाठीत खंजीर खुपसून निघून गेले. मात्र तरीदेखील आम्ही त्यांना कधीही विरोधी मानलं नसून उलट त्यांनीच आम्हाला विरोधी बनवले, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केला आहे.
विंहपीचे कार्यकर्ते ठाकरेसेनेत
उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधून उपनगरातील भाजप व विश्व हिंदू परिषदेच्याच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरेसेनेत पक्षप्रवेश केला. भाजप उत्तर मुंबई जिल्हा सचिव प्रदीप उपाध्याय, विश्व हिंदू परिषदेचे घनश्याम दुबे यांच्या त्याच्यात समावेश होता.





