West Bengal Politics : निळं बॅकग्राउंड, मध्यभागी फुटबॉलपटू आणि तिरंग्याचा स्पर्श; ममता बॅनर्जी गटाने प्रसिद्ध केला नवा निवडणूक लोगो
West Bengal Politics : ममता बॅनर्जी गटाने ‘ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ नावासह ‘फुटबॉल खेळाडू’ या नव्या अंतरिम निवडणूक चिन्हाचा लोगो प्रसिद्ध केला.

West Bengal Politics : तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्या गटाने सोमवारी नव्या निवडणूक चिन्हाचा लोगो प्रसिद्ध केला. निवडणूक आयोगाने या गटाला ‘ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ हे नाव आणि ‘फुटबॉल खेळाडू’ हे अंतरिम निवडणूक चिन्ह दिले आहे.
नव्या लोगोच्या मध्यभागी फुटबॉल खेळाडूचे चिन्ह असून, निळ्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या अक्षरांत पक्षाचे नवे नाव लिहिले आहे. या लोगोमध्ये केशरी, पांढरा आणि हिरवा रंगही वापरण्यात आला आहे. पक्षाच्या नेत्यांनी, आमदारांनी, खासदारांनी आणि कार्यकर्त्यांनी नव्या चिन्हाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पक्षातील अंतर्गत वादामुळे निवडणूक आयोगाने ‘ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ हे जुने नाव आणि ‘दोन फुले व गवत’ हे पारंपरिक चिन्ह तात्पुरते गोठवले आहे. त्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या गटाला नवे नाव व चिन्ह देण्यात आले. दुसऱ्या गटाला ‘डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस’ हे नाव आणि ‘लिफाफा’ चिन्ह देण्यात आले आहे.
पश्चिम बंगालमधील नंदीग्राम आणि रेजीनगर विधानसभा मतदारसंघांत ६ ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे मतदारांना नव्या नाव आणि चिन्हाची ओळख करून देण्यासाठी ममता गटाकडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे.






