Sayani Ghosh : ममतांचा काँग्रेसला पाठिंबा, काही तासांतच उमेदवाराला अटक; सयानी घोषांचा राहुल गांधींना संदेश म्हणाल्या…
Sayani Ghosh : या संपूर्ण प्रकरणावर नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टी ऑफ इंडियाच्या खासदार सायोनी घोष यांनी प्रतिक्रिया दिली.

Sayani Ghosh : पश्चिम बंगालमधील नंदीग्राम विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ममता बॅनर्जी यांच्या गटाच्या उमेदवार संचिता प्रधान डे यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांना पाठिंबा जाहीर केला. या घोषणेनंतर काही तासांतच मिलन प्रधान यांना जुन्या प्रकरणात अटक करण्यात आली. या घडामोडीमुळे नंदीग्राममधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
या संपूर्ण प्रकरणावर नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टी ऑफ इंडियाच्या खासदार सायोनी घोष यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितलं की, हा दोन पक्षांमधील विषय आहे. कोणाला काही आक्षेप असल्यास निवडणूक आयोग किंवा न्यायालयात दाद मागता येऊ शकते. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि भाजपसह प्रत्येक राजकीय पक्षाला लोकशाही पद्धतीने आपले अधिकार बजावण्याचा हक्क असल्याचंही त्यांनी म्हटलं.
काँग्रेस-TMC समन्वयावर सायोनी घोषांचं भाष्य
काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमधील संभाव्य समन्वयाबाबतही सायोनी घोष यांनी भूमिका मांडली. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने तृणमूल काँग्रेससोबत अधिक समन्वय साधावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दोन्ही पक्षांमधील संबंध केवळ नावापुरते न राहता प्रत्यक्षातही त्याचा परिणाम दिसायला हवा, असं घोष यांनी म्हटलं.
मिलन प्रधान यांच्या अटकेबाबत बोलताना घोष यांनी त्यांच्या विरोधात काही प्रलंबित प्रकरणं असल्याचा उल्लेख केला. निवडणुकीच्या काळात विविध कायदेशीर कारवाया आणि निर्णय होऊ शकतात, असं सांगत त्यांनी या प्रकरणात संबंधित पक्षांना निवडणूक आयोग किंवा न्यायालयाचा मार्ग उपलब्ध असल्याचं नमूद केलं.
काँग्रेसचं शिष्टमंडळ पोलीस ठाण्यात
दरम्यान, पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष सुभंकर सरकार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचं शिष्टमंडळ शुक्रवारी रात्री उशिरा पूर्व मिदनापूरमधील चंदीपूर पोलीस ठाण्यात पोहोचलं. शिष्टमंडळाने मिलन प्रधान यांच्या अटकेबाबत पोलिसांकडून माहिती घेतली. प्रधान यांना शनिवारी हल्दिया न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आल्याचं वृत्त आहे.
नंदीग्राम विधानसभा पोटनिवडणूक 6 ऑक्टोबर 2026 रोजी होणार असून, उमेदवारी माघारीनंतर झालेल्या या घडामोडींमुळे निवडणुकीपूर्वीच राजकीय चर्चेला वेग आला आहे. मिलन प्रधान यांना 2007 मधील नंदीग्रामच्या जमीन अधिग्रहणविरोधी आंदोलनाशी संबंधित जुन्या कथित हत्या प्रकरणात अटक करण्यात आली.





