Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये वक्फ लागू होऊ देणार नाही; ममता बॅनर्जी यांनी केले स्पष्ट

कोलकता : वक्फ कायदा केंद्र सरकारने बनवला आहे. तो कायदा केंद्रालाच लखलाभ असू दे. आम्ही पश्चिम बंगालमध्ये वक्फ लागू होऊ देणार नाही. आम्ही या कायद्याचे समर्थन करत नाही, असे प्रतिपादन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केले आहे. मुर्शिदाबाद हिंसाचारावर ममता बॅनर्जी यांनी लोकांना शांततेचे आवाहन केले आहे.
मुर्शिदाबादमध्ये झालेल्या हिंसक निदर्शनांच्या दरम्यान, बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, सर्व धर्माच्या लोकांना माझे नम्र आवाहन आहे की, कृपया शांत राहा, संयमी राहा. धर्माच्या नावाखाली कोणत्याही अधार्मिक कृत्यात सहभागी होऊ नका. प्रत्येक मानवी जीवन मौल्यवान आहे; राजकारणासाठी दंगली भडकावू नका. जे दंगली भडकावत आहेत ते समाजाचे नुकसान करत आहेत.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, लक्षात ठेवा, आम्ही असा कायदा बनवला नाही. त्यावर बरेच लोक नाराज आहेत. हा कायदा केंद्र सरकारने बनवला आहे. म्हणून तुम्हाला जे काही उत्तर हवे असेल ते तुम्ही केंद्र सरकारकडून विचारावे. आम्ही या प्रकरणात आमची भूमिका स्पष्ट केली आहे – आम्ही या कायद्याचे समर्थन करत नाही. हा कायदा आमच्या राज्यात लागू होणार नाही.
आम्ही कोणत्याही हिंसक कारवायाला पाठिंबा देत नाही. काही राजकीय पक्ष राजकीय फायद्यासाठी धर्माचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करत आहेत.त्यांच्याकडून दिशाभूल होऊ देऊ नका. दंगल भडकवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. प्रत्येक माणसाचे जीवन मौल्यवान आहे, राजकारणासाठी दंगलीत सहभागी होऊ नका. जे दंगल करत आहेत ते समाजाचे नुकसान करत आहेत, असे बॅनर्जी म्हणाल्या.
मला वाटते की धर्म म्हणजे मानवता, सद्भावना, सभ्यता आणि सौहार्द. मी सर्वांना शांतता आणि सौहार्द राखण्याचे आवाहन करते. शुक्रवारी नवीन कायद्याच्या निषेधार्थ मालदा, मुर्शिदाबाद, दक्षिण २४ परगणा आणि हुगळी जिल्ह्यांमध्ये हिंसाचार उसळल्याने पोलिस व्हॅनसह अनेक वाहनांना आग लावण्यात आली, सुरक्षा दलांवर दगडफेक करण्यात आली आणि रस्ते रोखण्यात आले.





