कोलकता : भाजपने मतदार यादीचे सर्वेक्षण करण्यासाठी देशभरातून 500 हून अधिक पथके पश्चिम बंगालमध्ये पाठवली आहेत. आता तुम्हाला स्वतः तपासावे लागेल की तुमचे नाव मतदार यादीत आहे की वगळण्यात आले आहे. पण मी जिवंत असेपर्यंत कोणालाही जनतेचा मतदानाचा अधिकार हिरावून घेऊ देणार नाही, अशी गर्जना तृणमूल काॅंग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. कोलकाता येथे तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या रॅलीला संबोधित करताना बॅनर्जी बोलत होत्या. बिहारनंतर, इतर राज्यांमध्ये सघन मतदार पुनर्रचनावरून राजकीय वाद अजूनही सुरुच आहे. विरोधी पक्ष हे मोदी सरकार आणि निवडणूक आयोगाला याबाबत सतत विरोध करत आहेत. बॅनर्जी यांनी आरोप केला की निवडणूक आयोग राज्य सरकारी अधिकाऱ्यांना धमकावत आहे. आयोगाचे अधिकार क्षेत्र निवडणुकीदरम्यान फक्त तीन महिने आहे, संपूर्ण वर्षभर नाही. भाजप स्वातंत्र्य चळवळीत बंगालींनी बजावलेली भूमिका विसरण्याचा प्रयत्न करत आहे. जर बंगाली भाषा नसेल तर राष्ट्रगीत आणि राष्ट्रीयगीत कोणत्या भाषेत लिहिले जाईल? स्वातंत्र्यलढ्यातील बंगालींची ऐतिहासिक भूमिका लोकांना विसरावी असे त्यांना वाटते. आम्ही हा भाषिक दहशतवाद सहन करणार नाही. यादरम्यान, मुख्यमंत्री ममता यांनी वीर सावरकरांचे नाव न घेता त्यांच्यावर गंभीर आरोप केले. पश्चिम बंगालच्या प्रशासनाने अनेक सामाजिक कल्याणकारी उपक्रम सुरू केले आहेत, तर केंद्रातील भाजप सरकार विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचारात गुंतले आहे. आम्ही महिलांसाठी लक्ष्मी भांडार योजना आणली आहे, तर भाजपकडे भ्रष्टाचार भांडार आहे. भाजप सरकार देशाला लुटत आहे, असेही त्या म्हणाल्या. अभिषेक बॅनर्जी यांचीही टीका तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी गुरुवारी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी आरोप केला की, कथित भगवा पक्ष मतदार यादीच्या विशेष सघन सुधारणेद्वारे मतदारांची निवड करत आहे आणि बंगाली लोकांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. जर मतदार यादीतून एकाही वैध मतदाराचे नाव काढून टाकले तर नवी दिल्लीत अशा कोणत्याही प्रयत्नांना विरोध केला जाईल. अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपला पुढील विधानसभा निवडणुकीत ५० जागा जिंकून दाखवण्याचे आव्हानही दिले.