Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये एसआयआर प्रक्रियेत गंभीर चुका; ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत राबवण्यात आलेल्या एसआयआर प्रक्रियेत गंभीर चुका झाल्या असून निवडणूक आयोग भाजपचे हित- संबंधांसाठी काम करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केला. येथील नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये टीएमसीच्या बूथस्तरीय एजंट्सच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, एसआयआर प्रक्रियेदरम्यान मतदार मॅपिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी आढळून आल्या आहेत. निवडणूक आयोग राज्य सरकारला कोणतीही पूर्वसूचना न देता निरीक्षकांची नियुक्ती करत आहे. निवडणूक आयोग भाजपच्या निर्देशानुसार काम करत आहे. एसआयआर प्रक्रियेचा गैरवापर करून मतदार यादीत गोंधळ निर्माण केला जात असल्याचा दावा त्यांनी यावेळी बोलताना केला.
ममता बॅनर्जी यांनी पुढे सांगितले की, एसआयआर सुनावणीसाठी सूक्ष्म निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अनेक केंद्रीय अधिकाऱ्यांना स्थानिक भाषेचे पुरेसे ज्ञान नाही. त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यातील पडताळणीसाठी ते अयोग्य असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकशाही प्रक्रियेची पवित्रता राखण्यासाठी टीएमसी कार्यकर्त्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी देताना कोणत्याही प्रकारच्या अन्यायाला थेट विरोध करावा, असे आवाहनही केले.





