Mamata Banerjee : मतदानातून सूड उगवा; मतदार यादीतील नाव कपातीवरून ममता बॅनर्जींचे मतदारांना आवाहन
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मुर्शिदाबादमधील समशेरगंज येथील सभेत केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला.

Mamata Banerjee : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मुर्शिदाबादमधील समशेरगंज येथील सभेत केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला. मतदार यादीतून जाणीवपूर्वक लोकांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप करत, या अन्यायाचा बदला घेण्यासाठी मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
ज्यांची नावे यादीत नाहीत, त्यांनी तातडीने न्यायाधिकरणाकडे दाद मागण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर मतदार यादीतील फेरफाराचा थेट आरोप केला. “हिंमत असेल तर समोरून लढा,” असे आव्हान त्यांनी भाजपला दिले.
निवडणूक आयोगाने केलेल्या मोठ्या प्रमाणावरील बदल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्यांनी कार्यकर्त्यांना मतमोजणीच्या दिवसापर्यंत (४ मे) सतर्क राहण्याचा इशारा दिला. ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्यास ते दुरुस्त न करता थेट बदलून घेण्याची मागणी करा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या.
वक्फ कायदा आणि प्रशासकीय नियुक्त्यांवरून टीका
वक्फ दुरुस्ती कायद्याच्या मुद्द्यावरून भाजपला प्रत्युत्तर देताना बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी अल्पसंख्याक आणि मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी केलेल्या कामांचा पाढा वाचला. राज्यातील अनुभवी अधिकाऱ्यांना परराज्यात पाठवून भाजप नेत्यांच्या नातेवाईकांची बंगालमध्ये नियुक्ती केली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. २०२४ च्या निवडणुकीतील मतदार यादी आता का वापरली जात नाही, असा सवाल करत त्यांनी सरकारच्या विश्वासार्हतेवर बोट ठेवले.
तसेच सत्तेत परतल्यास लक्ष्मी भंडार योजना आजीवन सुरू ठेवण्याचे आणि बंगाल युबा साथी योजनेद्वारे बेरोजगार तरुणांना दरमहा १,५०० रुपये भत्ता देण्याचे आश्वासन ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी दिले. तसेच, राज्यात कोणत्याही परिस्थितीत एनआरसी किंवा डिटेंशन कॅम्प होऊ देणार नाही, असा निर्धार त्यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवला.






